हरियाणात भूकंप! पहिल्या यादीनंतर राजीनाम्यांचं सत्र; ‘या’ दिग्गजांची भाजपाला सोडचिठ्ठी
BJP Candidates List for Haryana Elections : भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी (Hariyana Election) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भाजपच्या पहिल्या यादीत 67 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीनुसार मुख्यमंत्री नायब सिंह सैनी लाडवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर भाजपने अंबाला कँटमधून अनिल विज यांना उमेदवारी दिली आहे. तर कॅप्टन अभिमन्यू यांना नारनौलमधून तिकीट मिळालं. मात्र या यादीनंतर भाजपमध्ये भूकंप आला असून राजीनाम्यांचं सत्र सुरू झालं आहे. भाजपा किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षांपासून पक्षाच्या उपाध्यक्षांपर्यंत अनेक माजी आमदारांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.
BJP Candidates List : हरियाणात भाजपचे 67 शिलेदार ठरले; पहिली यादी जाहीर
राजीनामा दिलेल्या नेत्यांपैकी अनेक जण काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष आणि माजी आमदार सुखविंदर सिंह श्योराण यांचा समावेश आहे. त्यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. फेसबूकवर अलविदा भाजपा असे लिहून त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. बाढहा मतदारसंघातून लढण्यास ते इच्छुक होते मात्र भाजपाने येथून उमेद पातूवास यांना संधी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या श्योराण यांनी राजीनामा दिली.
श्योराण यांच्या प्रमाणेच उकलाना येथील भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सीमा गैबीपूर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला. तसेच भाजपा किसान मोर्चा चरखी दादरीचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ भल्ले चेअरमन यांनीही राजीनामा दिला. महम येथून भाजपाचे दावेदार शमशेर सिंह खरकडा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची चर्चा आहे.
गुरुग्राम येथील जीएल शर्मा आणि नवीन गोयल यांनीही बंडाचं निशाण फडकावत आपल्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. आता अशीही चर्चा सुरू झाली आहे ती भाजपा प्रदेश उपाध्यक्ष जीएल शर्मा काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊ शकतात. पुढील दोन दिवसांत शर्मा आपली रणनीती ठरवतील असेही सांगितले जात आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदार आणि माजी आमदरांना नारळ दिला आहे. यंदा पक्षाने या नेत्यांचा विचार केलेला नाही. सत्ताविरोधी लाटेचा अंदाज आल्याने पक्ष नेतृत्वाने अनेक मंत्री आणि आमदारांना तिकीट नाकारलं आहे. काही सर्वेंमध्ये या नेत्यांची स्थिती खराब असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. दुसरीकडे या यादीवर पक्षातील अनेक जुने नेते नाराज आहेत.
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, हरियाणामध्ये 1 ऑक्टोबरला होणार नाही मतदान; जाणून घ्या नवीन तारीख