Why do political leaders resort to lies? : आपण अनेकदा लोकांच्या अडचणींचा फायदा घेऊन भोंदूबाबाने फसवलं, पण जेव्हा सत्तेतील लोकचं अशा बाबांच्या आहारी जातात त्याला काय म्हणणार? सध्या अशाच एका बाबाचं प्रकरणं चर्चेत आहे. ते म्हणजे नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात सक्रिय असलेला अशोक खरात. त्याला अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाली. मात्र या प्रकरणाला खरं वळण मिळालं ते कारण जो राज्य महिला आयोग महिलांना न्याय देण्यासाठी आहे त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचा अशोक खरातसोबतचा एक व्हिडिओ समोर आला. यामध्ये त्या खरातची पाद्यपूजा करतात, त्याच्यासाठी छत्री धरतात अन् त्याच्या ट्रस्टवर अध्यक्षही आहेत… चाकणकरच नाही तर उपमुख्यमंत्री शिंदे, देखील त्याचे क्लाएंट असल्याचं समोर येत आहे. पण हे असं राजकीय बुबावाजीचं प्रकरण पहिलचं नाही. या अगोदरही अनेक मोठे राजकारणी अशा भोंदूंच्या संपर्कात असल्याचं समोर आले होते… कोण आहेत हे नेते आणि ते कोणत्या भोंदुंच्या संपर्कात होते. जाणून घेऊ सविस्तर
सुरूवातीला पाहूयात अशोक खरात प्रकरण काय?
नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष कॅप्टन अशोक खरात अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले. या अत्याचाराचे सीसीटीव्ही फुटेज आणि मॉर्फ केलेले व्हिडिओ जतन करून ठेवले होते. पण ऑफिसबॉय नीरज जाधवने खरातच्या नकळत ५८ महिलांवरील अत्याचाराचे फुटेज चोरले. खरातलाच ५ कोटींची खंडणी मागून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मात्र, खरातने खंडणी देण्याऐवजी वावी पोलिसांत धाव घेतली. मात्र तपासाची दिशा पुढे सरकताच चित्रच पालटले. खरातने ज्या महिलांचे फोटो खंडणीसाठी वापरले जात असल्याचा दावा केला होता, त्याच महिलांचे शोषण स्वतः त्यानेच केल्याचा संशय व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी अशोक खरातला अटक केली. याचे धागेदोरे राज्यातील बड्या नेत्यांशी आणि मंत्र्यांशी जोडले गेल्याचे संशय आहे. त्यामुळे यावर तातडीने ‘SIT’ स्थापन केली आहे.
तर अशोक खरातच्या प्रकरणादरम्यान सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी या अगोदरही मोठे राजकारणी अशा भोंदूंच्या संपर्कात आले असल्याची एक यादी देत त्यांनी सर्व राजकारण्यांनी आता तरी धडा घ्यावा. असा सल्लाही दिला. ते काय म्हणाले पाहूयात… इंदिरा गांधी – धीरेंद्र ब्रम्हचारी, नरसिंहराव – चंद्रास्वामी, शंकरराव चव्हाण आणि शिवराज चाकूरकर – सत्यसाई बाबा, अडवाणी आणि मोदी- आसाराम बापू, पंजाब हरियाणा नेते – राम रहीम, आणि आजचा खरात एकनाथ शिंदे, रूपाली चाकणकर,
नावे ही नावे फक्त झलक आहे. खरे तर अपवाद वगळता जवळपास सर्वच राजकीय नेत्यांचा असा एक गुरु असतो. स्थानिक महाराजांकडे तर त्या तालुका जिल्ह्यातील नेते जात असतात काहीजण उघडपणे भेटतात तर काहीजण अंधारात. अलीकडे मोबाईल आल्यामुळे फोटो शूटिंग होतात अन्यथा जुन्या काळात हे पुढे येत नव्हते.
राजकारण ही अत्यंत अस्थिर गोष्ट आहे. सतत असुरक्षिततेची भावना असते व तीव्र महत्त्वाकांक्षाही असते .त्यात राजकीय नेते पारंपरिक धार्मिक असतात. त्या मानसिकतेतून यांच्याकडे ते ओढले जातात,त्यात त्यांना काही गैरही वाटत नाही..त्यातून मग निवडणुकीचा अर्ज कधी भरायचा इथपासून तर शपथ कधी घ्यायची ? पुढे काय होईल हे विचारत राहतात व आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी होम हवन अशा अनेक गोष्टी करत राहतात.
साताऱ्यात राष्ट्रवादी-शिवसेनेचा गेम तर तर भाजपने साधला अचूक नेम, जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता
सामान्य माणसेही अशीच असतात तेही या बाबांच्या कच्छपी लागलेली असतात पण फरक हा आहे की हे भोंदू बाबा राजकीय संबंधांचा लगेच वापर सुरू करतात. बेकायदेशीर कामे करून घेतात. इस्टेट वाढवतात आणि अनेक राजकीय नेते यांच्याकडे येत असल्याचा सतत प्रचार करतात आणि त्यातून सामान्य माणसांमधील TRP भलताच वाढतो.. त्यातून पुन्हा ते आर्थिक व लैंगिक शोषण करून स्वतःचे महत्त्व वाढवतात,गुन्हेगारी कृत्य करतात व समाजातील बुवाबाजी त्यातून वाढत जाते… रामरहीम सारख्या विकृत बाबाला सतत सवलत देऊन आता शिक्षाही माफ होते.
असाराम बापूच्या दर्शनाला गुजरात मधील आणि देशातील अनेक राजकीय नेते भेटीचे फोटो आहेत. वाजपेयी अडवाणी नरेंद्र मोदी यांचे व्हिडिओ आहेत पण आपल्या पोलिस व न्याय व्यवस्थेने धाडस दाखवत तरीही त्यावर मात करत त्याला जेलमध्ये पाठवले पण त्यावरून राजकीय नेते काहीच धडा घेत नाही… अर्थात राजकीय नेत्यांचेही तीन प्रकार करावे लागतील.
१) अशा प्रकारच्या बाबांचे उद्योग माहीत असून त्याला मदत करणारे किंवा काळा पैसा लपवायला अशा बाबांचा उपयोग करणारे नेते
२)दुसरा प्रकार असुरक्षिततेतून व महत्त्वकांक्षेतून धार्मिक विधी,भविष्य यासाठी या नेत्यांना शरण जाणारे राजकीय नेते
३) तिसरा प्रकार जनतेमध्ये लोकप्रिय असलेल्या बाबाचे जाहीर दर्शन घेतले तर लोकांमध्ये आपले स्थान पक्के होते अशा भावनेने जाणारे नेते.. देवस्थानाच्या विविध महाराजांच्या दर्शनाला त्यामुळेच अनेक नेते जात असतात..महाराजांच्या मेळाव्यात आवर्जून जातात.किमान आजच्या या प्रकरणावर नेत्यांनी धडा घ्यावा आणि मोबाईलच्या काळात तुमची अंधारातली भेट ही गुप्त राहणार नाही हे लक्षात घेऊन बुवा बाबांपासून दूर राहावे…
रुपाली चाकणकरांकडून अनामिका कापून तंत्रमंत्र? सुषमा अंधारेंचे खळबळजनक आरोप
यातील सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की भारतीय राज्यघटनेने धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्था जर ठरवली असल्याने संवैधानिक पदावर असताना सरकारी गाडीने सरकारी यंत्रणेचा वापर करून अशा प्रकारच्या बुवा बाबांकडे जाऊ नये आणि त्याचबरोबर सरकारी यंत्रणेचा वापर करून धार्मिक ठिकाणी दर्शनाला जाणे ही टाळले पाहिजे.समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन देण्यासाठी नेत्यांनी त्याचे पालन करायला हवे कारण एकदा नेते धार्मिक ठिकाणी गेले त्या देवस्थानची गर्दी ही वाढत जाते…लोकांच्या अंधश्रद्धेला बळ मिळते.
सत्य साईबाबा यांच्या मृत्यूनंतर तिथे जाऊन रडणारा सचिन तेंडुलकर यामुळेच अनेकांना खटकला होता. काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा या ठिकाणी अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना सत्यसाईबाबा यांना तिथे निमंत्रित करून त्यांची पूजा केली होती.. तेव्हा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी त्याला विरोध करून एक लेख लिहिला होता व ज्या सत्यसाईबाबांवर गुन्हे दाखल आहेत व हातचलाखीचे जे प्रयोग करतात अशी व्यक्ती संविधानिक पदावर असलेल्या मुख्यमंत्री निवासस्थानात येऊच कशी शकते ?असा प्रश्न विचारला होता.
आज दुर्दैवाने धार्मिक राजकारणामध्ये हे कोणालाही खटकत नाही पण आजच्या घटनेने सर्वपक्षीय नेत्यांना सद्बुद्धी लाभो हीच या सर्वत्र पसरलेल्या सर्वपक्षीय श्रद्धास्थान असलेल्या बाबांच्या चरणी प्रार्थना.
