Ashok Kharat : सोलापुरात ऑपरेशन परिवर्तन ते पुणेकरांना शिस्त; कॅप्टनचा ‘गेम’ ओव्हर सातपुते करणार
Ashok Kharat ज्या अधिकाऱ्याने पुण्यातील ट्रॅफिक सुधारली, सोलापूरचा अवैध धंदा संपवला, त्या आता नाशिक हायप्रोफाईल प्रकरणाचा छडा लावणार आहेत.
IPS Tejaswini Satpute Appointed In Nashik Ashok Kharat Case : दोनशे कोटींची माया, 58 महिलांच्या अब्रूचा बाजार आणि नाशिकच्या राजकीय वर्तुळात वावरणारा एक ‘अंकशास्त्रज्ञ’ अशोक खरात. वरून ज्योतिष आणि आतून ‘सैतान’ असलेल्या या नराधमाचा गेम आता ओव्हर होणार आहे. कारण, या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने थेट ‘SIT’ तैनात केली आहे आणि या टीमची धुरा आहे 2012 बॅचच्या धडाकेबाज आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या खांद्यावर. सातपुते यांनी पुण्यात दंड न थोपटता हेल्मेटचा ‘पॅटर्न’ बदलला आणि सोलापूरच्या बेकायदेशीर दारूभट्ट्यांचा ‘ऑपरेशन परिवर्तन’ने चक्काचूर केला. त्यामुळेच आता नाशिक प्रकरणात सातपुते यांची एन्ट्री झाल्याने खरातची आता खैर नसल्याचे बोलले जात आहेत. पायलट होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तेजस्वी सातपुते यांनी जेव्हा पोलीस वर्दी घातली, तेव्हा त्यांनी गुन्हेगारीची ‘हवा’ काढली. त्यांची कारकीर्द नेमकी कशी त्याबद्दल जाणून घेऊया..
चष्मा लागला अन् पायलट होण्याचं स्वप्न भंगलं
तेजस्वी सातपुते यांचं बालपणापासूनचं स्वप्न होतं ‘पायलट’ होण्याचं. पण चष्मा लागला आणि स्वप्न भंगलं. मात्र, त्यांनी हार मानली नाही. बायोटेक्नॉलॉजी आणि एलएलबी पूर्ण केल्यानंतर त्यांनी यूपीएससीचा मार्ग निवडला. पहिल्या प्रयत्नात अपयश आलं, पण जिद्द सोडली नाही. ‘स्कोरिंग’ विषयामागे न धावता, स्वतःला आवडणाऱ्या मराठी आणि इतिहास विषयाच्या जोरावर त्यांनी आयपीएस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.
तेजस्वी सातपुते या केवळ ‘कडक’ शिस्तीच्या अधिकारी नाहीत, तर त्या ‘सॉफ्ट पोलीसिंग’मध्येही माहीर आहेत.
पुण्यात जेव्हा त्या डीसीपी होत्या, तेव्हा फक्त 20 टक्के लोक हेल्मेट वापरायचे. त्यांनी दंड करण्याऐवजी सुरुवात स्वतःच्या पोलीस प्रशासनापासून केली. हेल्मेट नसलेल्या पोलिसांना पोलीस आयुक्तालयात एन्ट्री नाकारली जाईल तसेच चलानदेखील कापले जाईल असे जाहीर केलं. याशिवाय हेल्मेटसाठी त्यांनी आणखी एक प्रयोग केला होता. ज्यात त्यांनी हेल्मेट घालून आणि हेल्मेट न घालता ठराविक अंतर पार करण्यास दोन व्यक्तींना सांगितले. त्यानंतर त्यांनी एक प्रश्न विचारला की, विनाहेल्मेट प्रवास पूर्ण केल्यावर वेळेत केवळ 4 मिनिटांचा फरक पडला. अशावेळी फक्त 4 मिनिटांसाठी प्राणाचा धोका पत्करणे योग्य आहे का?, की हेल्मेट घालून सुरक्षितपणे जाणे? त्यांच्या या प्रयत्नाचा लोकांवर सकारात्मक परिणाम झाला आणि पुण्यात हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या 20 टक्क्यांवरून थेट 80 टक्क्यांपर्यंत पोहोचली. अनेकदा आपण समोरच्या व्यक्तीने आपला दृष्टिकोन बदलावा अशी अपेक्षा करतो; मात्र जर आपण सुरुवात स्वतःपासून केली, तर पुढचे मार्ग आपोआप सोपे होतात असे सातपुते नेहमी सांगतात.
सोलापूरचा अवैध धंदा मुळासकट उपटून काढला
2012 बॅचच्या आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची ऑक्टोबर 2020 मध्ये सोलापूर (ग्रामीण) पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली, तेव्हा आपल्याला कामाची सुरुवात नेमकी कुठून करायची आहे, हे त्यांना पक्के ठाऊक होते. सात वर्षांपूर्वी, एक प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी म्हणून त्यांनी या भागात दोन आठवड्यांहून अधिक काळ घालवला होता. त्या काळातच त्यांनी या भागातील सर्वात मोठी समस्या म्हणजे अवैध दारू हे ओळखले होते. जेव्हा सातपुते यांनी सोलापूरच्या एसपी पदाची धुरा सांभाळली, तोपर्यंत या जिल्ह्याची ओळख बीड, धाराशीव आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमेला लागून असलेल्या किमान नऊ जिल्ह्यांना अवैध दारू पुरवणारा मुख्य सप्लायर म्हणून झाली होती.
नियुक्तीच्या सुरुवातीचे काही महिने त्यांनी हा अवैध धंदा किती खोलवर पसरला आहे, हे समजून घेण्यात घालवले. त्यानंतर, सप्टेंबर 2021 मध्ये त्यांनी ‘ऑपरेशन परिवर्तन’ ला सुरुवात केली. ही एक चार-सूत्रीय कार्ययोजना होती, ज्यामध्ये जिल्ह्यातील हातभट्ट्यांवर कठोर कारवाई करण्यासोबतच, गुन्हेगारांचे समुपदेशन करण्यासारख्या सॉफ्ट पोलीसिंग पद्धतींचाही समावेश करण्यात आला होता.
त्यामुळे ज्या अधिकाऱ्याने पुण्यातील ट्रॅफिक सुधारली आणि सोलापूरचा अवैध धंदा संपवला, त्या आता नाशिकमधील खरात या हायप्रोफाईल प्रकरणाचा छडा लावणार आहेत. खरातचे राजकीय संबंध आणि 200 कोटींच्या मालमत्तेचा गुंता तेजस्वी सातपुते कशा सोडवतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.