साताऱ्यात राष्ट्रवादी-शिवसेनेचा गेम तर तर भाजपने साधला अचूक नेम, जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता
मकरंद पाटील यांच्या गाडीतूनही काही सदस्यांना आणण्यात आले. त्यामुळे सिनेस्टाईल थरार जिल्हा परिषदच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत पाहायला मिळाला.
BJP rules the Zilla Parishad in Satara : सातारा जिल्हा परिषदेत सत्तेसाठी रंगलेल्या राजकीय सारीपाटात अखेर भारतीय जनता पक्षाने बाजी मारत सत्ता आपल्या बाजूला खेचली आहे. नाट्यमय आणि चुरशीच्या घडामोडीनंतर अध्यक्षपदी प्रिया शिंदे, तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड झाली. या संपूर्ण प्रक्रियेत भाजपने आखलेली रणनीती आणि शेवटच्या क्षणी खेळलेला माईंड गेम चर्चेचा विषय ठरला आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी सातारा जिल्हा परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र राहणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्यांचे पारडे जड मानले जात होते. भाजपला सत्तेसाठी आवश्यक असलेल्या मतांची कमतरता भासत असल्याने निकाल काय लागणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मात्र 19 मार्चच्या रात्रीपासूनच साताऱ्यात राजकीय घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांचे अपहरण झाल्याची तक्रार करण्यात आली. या दोन प्रकरणामुळे वातावरण अधिकच तापले. नंतर संबंधित सदस्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन आम्ही स्वतःहून पक्षासोबत गेल्याचे लेखी दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे खासदार नितीन पाटील यांनी दिली. तरी देखील या घटनेमुळे संशयाचे वातावरण कायम राहिले.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात आज प्रचंड थरार पाहायला मिळाल. भाजपकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य फोडण्याचा जोरदार प्रयत्न शेवटपर्यंत सुरू होते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही सदस्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचा कथित प्लॅनही आखण्यात आले होता.
रुपाली चाकणकरांकडून अनामिका कापून तंत्रमंत्र? सुषमा अंधारेंचे खळबळजनक आरोप
या सगळ्या घडामोडींमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांनी महत्त्वाची भूमिका बजावत पोलिसांच्या वॉचवर असलेल्या सदस्यांना थेट आपल्या गाडीतून सुरक्षित सभागृहात पोहोचवलं. सभागृहात घेऊन जाताना झालेल्या झटापटीमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला देखील लागले. मकरंद पाटील यांच्या गाडीतूनही काही सदस्यांना आणण्यात आले. त्यामुळे सिनेस्टाईल थरार जिल्हा परिषदच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत पाहायला मिळाला.
याचदरम्यान, आणखी एका सदस्यावर गुन्हा दाखल झाल्याची चर्चा रंगली, मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. या सर्व घडामोडींमुळे सत्तेसाठी पडद्यामागे शह-कटशहाचे राजकारण रंगले असल्याचे स्पष्ट झाले. प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी भाजपने अनपेक्षित चाल खेळत शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली. या निर्णयामुळे विरोधकांच्या रणनीतील मोठा धक्का बसला. उपाध्यक्षपदासाठी भाजपने राजू भोसले यांना रिंगणात उतरवले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य फुटल्याची चर्चा होती. खासदार नितीन पाटील यांनी देखील आमचे दोन सदस्य काही दिवसांपूर्वी उचलून नेण्यात आल्याचा आरोप केला. तसेच शिवसेनेचा देखील एक सदस्य भाजपच्या बाजूला गेल्याची चर्चा रंगली. या सर्व हालचालींमुळे भाजपने आवश्यक संख्याबळ उभे करत सत्ता मिळवण्यात यश मिळवले. बहुमत असून देखील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडीला सत्ता राखण्यात अपयश आले. अखेर सातारा जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता प्रस्थापित झाली. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही रणनीती यशस्वीपणे राबवल्याचे मानले जात आहे. या संपूर्ण घडामोडीनंतर एकाच प्रश साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. तो म्हणजे बहुमत असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गेम कोणी केला?