कर्नाटक सरकारमध्ये सत्ता वाटपाचा घोळ कायम असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. (Karnatak) राज्य सरकारमध्ये असलेला घोळ लवकरात लवकर दूर करावा अशी विनंती उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्याकडं केली आहे. तामिळनाडू दौरा आटोपून दिल्लीला जाण्यासाठी म्हैसूर विमानतळावर आलेल्या राहुल गांधी यांच्याशी स्वतंत्र चर्चेदरम्यान शिवकुमार यांनी राज्य काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या गोंधळाकडं लक्ष देण्याची मागणी केली.
दरम्यान, या भेटीवेळी त्याच विमानतळावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेही होते. परंतु, शिवकुमार यांनी राहुल यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली आहे. सत्तावाटपासह अनेक मुद्द्यांवर गेल्या काही दिवसांपासून राहुल यांची भेट घेण्याचे प्रयत्न करणाऱ्या शिवकुमार यांनी प्रथमच त्यांच्याशी स्वतंत्र बोलून लक्ष वेधलं. म्हैसूर विमानतळावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काही मंत्री उपस्थित असतानाही त्यांना सोडून विमानतळाच्या दुसऱ्या कोपऱ्यात शिवकुमार त्यांच्याशी काही वेळ बोलले. त्यांनी राज्यातील काही घडामोडी राहुल यांच्या लक्षात आणून दिल्या.
10 मिनिटांच्या डिलिव्हरी बंदीचा क्विक कॉमर्स; वर परिणाम काय? सोप्या शब्दात समजून घ्या सर्वकाही
सत्ता हस्तांतरण आणि मंत्रिमंडळ फेररचना या नावाने काही मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. तो लवकरात लवकर दूर करावा, अशी विनंती केली. सरकार स्थापनेच्या वेळी झालेल्या करारानुसार हायकमांडने निर्णय घ्यावा. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रेकॉर्डब्रेक कारकीर्द केली आहे. मात्र, सत्ता सोडण्याबाबत कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्याऐवजी हायकमांड जे सांगेल त्याप्रमाणे ऐकणार असल्याचे ते सांगत आहेत. म्हणून हायकमांडने तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
सत्ता हस्तांतरणावरील अडचण सुटेपर्यंत मंत्रिमंडळ पुनर्रचनेबाबत कोणतीही प्रक्रिया राबवू नये, असे मुख्यमंत्र्याना पटवून देण्याची विनंती शिवकुमारांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्ष सज्ज होत असताना सरकार स्तरावर निर्माण झालेला गोंधळ कार्यकर्त्यांवर मोठा परिणाम करेल. म्हणून हायकमांडचा हस्तक्षेप अपरिहार्य आहे, असे त्यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.शिवकुमार यांच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय न घेता राहुल गांधी यांनी 27 जानेवारीनंतर आपल्या कार्यालयाशी संपर्क साधून वेळ पाहून दिल्लीला यावे, असे शिवकुमारांना सांगितले.
सत्ता हस्तांतरण आणि मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत प्रदेश काँग्रेसमध्ये असलेला गोंधळ सध्या तरी दूर होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. राज्य सरकारला हजार दिवस पूर्ण झाल्यानिमित्त 13 फेब्रुवारी रोजी हावेरी येथे आयोजित साधना मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
तामिळनाडूला एका खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राहुल गांधी खास विमानाने म्हैसूरला पोहोचल्यानंतर विमानतळावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते तामिळनाडूला रवाना झाले. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हावेरीमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या साधना मेळाव्याची माहिती दिली. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केंद्र सरकारने मनरेगा योजना रद्द केल्याच्या विरोधात पक्षाने आयोजित केलेल्या जनआंदोलनाची माहिती दिली.
