सुरत : आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी गुजरातला (Gujrat) दोन सर्वात मोठे गिफ्ट मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याहस्ते आज (17 डिसेंबर) आंतरराष्ट्रीय हिरे आणि दागिन्यांच्या व्यवसायासाठी जगातील सर्वात मोठ्या ‘सुरत डायमंड बोर्सचे’ उद्घाटन करण्यात आले. याशिवाय सुरत विमानतळावर (Surat international airport) एका नवीन एकात्मिक टर्मिनलच्या इमारतीचेही उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे वर्षभरात तब्बल 55 लाख प्रवासी क्षमता पण वाढवण्याचा अंदाज आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार, हिरे आणि दागिन्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायासाठी हे जगातील सर्वात मोठे आणि सर्वात आधुनिक केंद्र असणार आहे. सुरत डायमंड बोर्समध्ये रफ आणि पॉलिश अशा दोन्ही हिऱ्यांची खरेदी-विक्री केली जाणार आहे. याशिवाय बोर्समध्ये आयात-निर्यातीसाठी अत्याधुनिक कस्टम क्लिअरन्स हाऊस, किरकोळ दागिन्यांच्या व्यवसायासाठी ज्वेलरी मॉल, आंतरराष्ट्रीय बँकिंग सुविधा आणि सेफ व्हॉल्ट यासारख्या सुविधा उपलब्ध असणार आहेत. (world’s largest ‘Surat Diamond Bourse’ for the international diamond and jewelery business was inaugurated by Prime Minister Narendra Modi)
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ही इमारत भारतीय डिझायनर, भारतीय साहित्य आणि भारतीय संकल्पना यांच्या क्षमतांचे प्रतिनिधित्व करते. ही इमारत नव्या भारताच्या नव्या ताकदीचे आणि नव्या संकल्पाचे प्रतीक आहे. ते म्हणाले की, सुरत एकेकाळी सन सिटी म्हणून ओळखले जात होती. पण लोकांनी आपल्या मेहनतीने डायमंड सिटी आणि सिल्क सिटी बनवली आहे. आज सुरत हे लाखो तरुणांच्या स्वप्नांचे शहर आहे. आता सुरत आयटी क्षेत्रातही प्रगती करत आहे.
गेल्या 10 वर्षांत भारत आर्थिक क्षमतांमध्ये दहाव्या क्रमांकावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर वातावरण भारताच्या बाजूने आहे. जगभरात भारताची प्रतिष्ठा शिखरावर आहे. जगभरात भारताची चर्चा होत आहे. मेड इन इंडिया आता एक मजबूत ब्रँड बनला आहे, आता आता मोदींनी देशाला खात्री दिली आहे की त्यांच्या तिसऱ्या पर्वात भारताचा जगातील टॉप-3 अर्थव्यवस्थांमध्ये नक्कीच समावेश होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.