Download App

वायएस शर्मिलांच्या काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्त ठरला; भावाच्या पराभवासाठी बहिणच करणार मदत

अमरावती : वायएसआर तेलंगणा पक्षाच्या संस्थापक अध्यक्षा आणि वायएसआर काँग्रेस (YSR Congress) पक्षाचे प्रमुख, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांची बहीण वायएस शर्मिला यांचा काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. येत्या आठवड्यात त्यांचा काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा होती. काँग्रेसकडून शर्मिला यांना येत्या लोकसभा आणि त्यासोबतच होणाऱ्या आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसचा पराभव करण्यासाठी मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशात काँग्रेसला पुनरुज्जीवित करण्याच्या दृष्टीने हे मोठे पाऊल मानले जात आहे. (YS Sharmila, founder president of YSR Telangana Party will be joining the Congress this week)

विभाजनापूर्वी आंध्र प्रदेशमध्ये दिवंगत मुख्यमंत्री आणि काँग्रेस बडे नेते वायएसआर राजशेखर रेड्डी यांचा मोठा प्रभाव होता. मात्र 2010 मध्ये त्यांचे हेलिकॉप्टर अपघातात निघन झाल्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला उतरती कळा लागली. आपल्याला डावलल्याचा आरोप करत राजशेखर रेड्डी यांचा मुलगा जगन मोहन रेड्डी यांनी काँग्रेसशी फारकत घेतली आणि वायएसआर काँग्रेसची स्थापना केली. त्यांच्यासोबत 18 आमदार आणि काँग्रेसच्या एका खासदाराने राजीनामा दिला. त्यानंतर रेड्डी यांनी संपूर्ण राज्यात पदयात्रा काढून वातावरण निर्मिती केली. याच दरम्यान, भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली रेड्डी यांना अटक झाली.

Manipur Violence : नव्या वर्षात मणिपूर पेटलं! गोळीबारात चौघांचा मृत्यू, पाच जिल्ह्यांत कर्फ्यू

त्यानंतर आई वायएस विजयम्मा आणि बहीण वायएस शर्मिला यांनी मोहिमेचे नेतृत्व केले. वायएसआर काँग्रेसने त्यानंतरच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जोरदार मुसंडी मारली. मात्र 2021 मध्ये शर्मिला आणि भाऊ जगनमोहन यांच्यात राजकीय मतभेद असल्याचे समोर आले. त्यांनी वायएसआर काँग्रेस पक्षापासून फारकत घेत YSR तेलंगणा पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली आणि तत्कालीन के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात प्रचार सुरू केला. मात्र त्यांनी तेलंगणा निवडणूक लढणार नसून काँग्रेसच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली. यानंतर त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करु इच्छितात याबद्दल चर्चा सुरु झाल्या.

चालकांचा संप पण पेट्रोल पंप खुलेच राहणार ! टँकरला पोलीस संरक्षण

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसची आंध्रमध्ये मतसंख्या गेल्या काही वर्षांत कमालीची घसरली आहे. आता फक्त 1 टक्क्यांच्या आसपास काँग्रेसला मत मिळत आहेत. त्याचवेळी भावाच्या विरोधात बंड करुन बाहेर पडलेल्या शर्मिला यांना त्यांचा पक्ष चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची चणचण भासत आहे. अशात आंध्र प्रदेशातील निवडणुकांसाठी फार थोडा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे अशा काळात जर शर्मिला यांच्याकडे आंध्रप्रदेशमध्ये पक्षाची धुरा सोपविल्यास पक्षाला मोठा फायदा होऊ शकतो, अशी आशा काँग्रेसचे नेते व्यक्त करत आहेत.

follow us