सोलापूर : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर जोरदार शाब्दिक टीका केली आहे. बायकोला साडी घेण्यासाठी २०० रुपये नाहीत, असं म्हणणारे शहाजीबापू पाटील कोट्यवधींचा बंगला कुठल्या पैशांतून बांधत आहेत, असा सवाल अंधारेंनी विचारला.
दरम्यान अंधारे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र दौरा करत आहेत. ‘महाप्रबोधन यात्रे’च्या माध्यमातून त्या विविध मतदारसंघांना भेटी देत असून संवाद साधत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून सुषमा अंधारे यांनी नुकताच सोलापूर दौरा केला. यावेळी त्यांनी शहाजी बापू पाटील यांच्यावर टीका केली.
अंधारे भाषणात म्हणाल्या, “शहाजीबापू म्हणाले होते की, आपण खूप निष्कलंक माणूस आहे. त्यामुळे बापूला आठवण करून द्यायला पाहिजे. बायकोला साधी २०० रुपयांची साडीही घेता आली नाही, एवढे कष्ट आपण केले, असं बापू म्हणाले होते. पण आता बापूंनी काही प्रश्नांची उत्तरं द्यावीत.”
शहाजीबापू पाटलांना उद्देशून सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “वसंतदादा पाटील यांच्या नावाने तुम्ही जी सूतगिरणी नोंदली होती. त्या सूतगिरणीचे शेअर्सही गोळा झाले होते. याला सरकारने काही अनुदानही दिलं होतं. त्याची काही जमीनही होती. हे सगळं आता कुठे आहे बापू ? ती जमीनही गायब, अनुदानही गायब, शेअर्सचे पैसेही गायब. एवढं सगळं गायब केलं बापू ढेकर तरी द्यायचा की…”
बापू म्हणाले बायकोला लुगडं घ्यायला दोनशे रुपये नाहीत. पण बापू मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. अकरा वेळा आमदार झालेल्या आबासाहेबांना जे जमलं नाही, ते तुम्ही अवघ्या दोन वर्षात करून दाखवलं. तुमच्याकडे असं कोणतं पैशांचं झाड लागलंय? ज्यामुळे तुम्ही दोन एकरात कोट्यवधींचा बंगला बांधला,” असा खोचक सवाल सुषमा अंधारेंनी विचारला.