Download App

अजित पवार एकटेच नाही, तर ‘या’ नेत्यांसोबत दिल्लीत दाखल, खातेवाटपाचा तिढा सुटणार?

  • Written By: Last Updated:

शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आता या गोष्टीला आठवडा झाला तरी या मंत्र्यांचे खातेवाटप झालेले नाही. त्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आता दिल्लीत (Delhi)दाखल झाले आहेत. खातेवाटपाचा तिढा न सुटल्याने आता दिल्लीत महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. अजित पवार हे पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel), हसन मुश्रिफ यांच्यासह दिल्लीला रवाना झालेत. (Ajit Pawar Praful Patel in delhi for solve Cabinet expansion conflict)

राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना बंगले आणि दालनाचेही वाटप करण्यात आले. परंतु अद्याप खाटेवाटप झालं नाही. त्यामुळेच ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गटाने राज्य सरकारवर टीका केली. दरम्यान, खातेवाटपासंदर्भात गेल्या तीन दिवसांपासून सीएम एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सातत्याने भेटीगाठी सुरू होत्या. मात्र, सीएम शिंदे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे मंगळवारी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खातेवाटपावर एकमत होऊ शकले नाही. दोन खात्यांवरून तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाला विलंब होत आहे. परिणामी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना बिनखात्याचे मंत्री म्हणून वावरावे लागते. त्यामुळे अजित पवारांना आता थेट दिल्लीत धाव घेतली.

Letsupp Special : माझे कसले छंद आहेत, जाहीर करा… महाराष्ट्रालाही पाहु द्या : आढळरावांचं कोल्हेंना आव्हान! 

सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांना अर्थखातं हवं आहे. मात्र, शिंदे गट अजित पवारांना अर्थ खातं देण्याच्या विरोधात आहे. महाविकास आघाडीमध्ये असतांना त्यांच्याकडून निधी वाटपात भेदभाव केला होता असा शिंदे गटाच्या आमदारांचा आरोप आहे. तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी राष्ट्रवादीला आर्थिक खाती सांभाळण्याचा अनुभव आहे, असं सांगत अर्थखातं राष्ट्रवादीलाच देण्यात यावं, अशी आग्रही भूमिका घेतली.

यासोबतच आमदार भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदाबाबतही पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीला रायगडचं पालकमंत्रीपद हवं आहे. पण, रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे. त्यामुळं हा तिढा सोडवण्यासाठी अजित पवार आपल्या पक्षाच्या दोन नेत्यांसह दिल्लीत दाखल झाले आहेत. अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अजित पवार दिल्लीला रवाना झाल्यानंतर आता सीएम एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर महत्वाची बैठक होणार आहेत. या बैठकीत खाते वाटपासंदर्भात महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत शिवसेनेची असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळं अर्थखातं आणि रायगडच्या पालकमंत्रीपद कोणाला मिळणार? आणि नाराज गटाची नाराजी अमित शाह कशी दूर करणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us