Letsupp Special : माझे कसले छंद आहेत, जाहीर करा… महाराष्ट्रालाही पाहु द्या : आढळरावांचं कोल्हेंना आव्हान!
पुणे : “माझे नेमके कसले छंद आहेत, ते जाहीर करावं. बघू द्यावं महाराष्ट्राला माझे छंद”, असं प्रतिआव्हान माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांना दिलं आहे. ते लेट्सअप मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बोलत होते. कोल्हे यांनी मालिका, सिनेमे, नाटके खूप केली. मात्र मतदारसंघात त्यांनी गेल्या चार वर्षांत काय काम केले? असा सवाल काही दिवसांपूर्वी आढळराव पाटील यांनी केला होता. त्याला “अभिनय हा माझा छंद आहे आणि माझे छंद चार चौघात उजळ माथ्याने सांगू शकतो, तशी परिस्थिती तुमच्या छंदा बाबत आहे का? असा सवाल करत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांना अडचणीत टाकलं होतं. त्यावर त्यांनी कोल्हो यांना आव्हान दिलं आहे. (Former MP Shivajirao Adharao Patil has challenged MP Amol Kol he)
काय म्हणाले शिवाजीराव आढळराव पाटील?
लेट्सअप मराठीशी बोलताना आढळराव पाटील म्हणाले, मी गेले दोन दिवस विचार करत आहे की नेमके कसले छंद आहेत. काय मला तेच कळत नाही. लोकांमध्ये जाणं, लोकांमध्ये राहणं, लोकांची काम करणं हा माझा छंद आहे. हे उगीच आपलं नळावरील भांडणासारखं, तुझा काय छंद आणि याचा काय छंद. हे त्यांना शोभत नाही. त्यांनी उघडपणे सांगावं की काय छंद आहेत. काहीही आपलं, तुम्हाला चांगणी वाणी दिली, चांगलं वक्तृत्व दिलं त्याचा असा दुरुपयोग करु नका. काही असेल तर सांगा. कशासाठी थांबला तुम्ही? जाहीर करा माझे छंद, बघू द्या महाराष्ट्राला.मी असं नाही म्हणणार की मी तुमचे छंद काढतोय. मला जरी माहित असलं तरीही मी गप्प बसणार. इतरांचे छंद काढणे हा माझा छंद नाही, असा टोलाही त्यांनी कोल्हे यांना लगावला.
अमोल कोल्हे यांनीच भाजपचे दरवाजे ठोठावले; आता चावी आढळरावांकडे!
शिवाजीराव आढळळराव पाटील यांनी पवार साहेबांचे दरवाजे ठोठावले होते, पण त्याची चावी माझ्याकडे आहे, असा दावा काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांनी केला होता. यावेळी बोलताना या दाव्यालाही आढळराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले, हा किती पोरकटपणा आणि बालिशपणा आहे. मुर्खाच्या नंदनवनात वागण्यासारखं हे विधान आहे.काही कारण नाही. शरद पवारांकडे दरवाजा ठोठवण्याचा काय संबंध आहे माझा? मी एकनाथ शिंदेंसोबत समाधानी आहे, त्यांनी मला ताकद दिली आहे. उलट अमोल कोल्हे यांनी भाजपचे दरवाजे ठोठवले होते. त्यांना माहित आहे की चावी अढळरावांच्या खिशात आहे. म्हणून ते परत गेले आहेत.
अन्यथा कधी भाजपसोबत फ्लर्ट करायचं. अजितदादांच्या शपथविधीला जायचं. शरद पवारांना सांगायचं मी राजीनामा देतोय. जनतेला सांगायचं मी राजीनामा द्यायला निघालोय. नंतर साहेबांना सांगायचं मी राजीनामा दिलाय काय करु? कोणत्या जगात वावरत आहात तुम्ही? पवार साहेब लोकमान्य नेते आहेत. ते माझ्या जागेवर उभे राहणार होते. मी ती जागा मोकळी न केल्यामुळे त्यांना दुसरीकडे जावं लागलं. तेव्हापासून त्यांचा आणि माझा संबंध नाही. मी का जाऊ त्यांच्याकडे? उगाच काही तरी बोलायचं, असं ही आढळराव पाटील म्हणाले.