राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार आणि पक्षातील आमदारांचा मोठा गट घेऊन भाजप सोबत जाऊन सरकार स्थापन करणार या शक्यतेवर राज्यात गेल्या आठवड्या भरापासून सुरू असलेला राजकीय धुरळा अखेर आज खाली बसला. त्याबरोबर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या शिवसेनेतील आमदारांनी सुटकेचा श्वास सोडला.
सुटकेचा श्वास असं म्हणण्याचं कारण म्हणजे अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच जागी येणार असल्याच्या वावड्या उठत होत्या. राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात निकालाच्या उंबरठ्यावर असलेल्या याचिकेच्या संभाव्य निकालावरून अनेकांनी तर्क बांधले होते.
शिंदे यांच्यासह 16 आमदार पात्र ठरणार असल्याची भीती शिवसेनेला आजही आहे, त्यातूनच अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा भाजपाचा ‘प्लॅन बी’ असल्याचे बोलले जात होते त्यामुळे शिंदे यांच्यासह त्यांच्या इतर आमदारांच्या मनात अस्वस्थता होती. ती आता अजित पवार यांच्या खुलाशानंतर दूर झाली असण्याची शक्यता आहे.
अजित पवार भाजपसोबत गेले तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू, असे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले होते. तर माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवार सोबत आले तर त्याचा फायदा शिवसेनेला देखील होईल अशी भूमिका मांडली होती.
अफवांना विराम ! मी राष्ट्रवादीमध्येच राहणार, अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका
अजित पवार यांच्याशी नक्की काय धोरण ठेवायचे? याबाबत शिवसेनेतही मतभेद असल्याचे यातून दिसून आले. आता अजित पवार यांनीच आपण राष्ट्रवादीत राहणार असल्याचे स्पष्ट केल्याने शिंदे यांनाही दिलासा मिळाला असण्याची शक्यता आहे.