Amit Shah targets Rahul Gandhi: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील कार्यक्रमातून काँग्रेस आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. गेल्या तीन वर्षांपासून काँग्रेसला सातत्याने निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे काँग्रेस फ्रस्ट्रेशन काढत आहे, असे शहा म्हणाले. तसेच परदेशात जाऊन भारताची प्रतिमा खराब करण्यापेक्षा राहुल गांधी यांनी गावागावात जाऊन जनतेशी संवाद साधावा, असा सल्लाही त्यांनी दिला. भारताची बदनामी करण्याचे राजकारण सुरू ठेवल्यास काँग्रेसला पुढील 30 वर्षे सत्तेपासून दूर राहावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
नाशिक, बीड, केजमधील प्रकरणात आरोप; डॉ. अशोक थोरातांना महत्त्वाचं पद ! अंजली दमानियांचा सरकारला सवाल
पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे आयोजित सहकार क्षेत्राशी संबंधित कार्यक्रमात अमित शाह बोलत होते. यावेळी त्यांनी सहकार क्षेत्रातील केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना, भारत टॅक्सी सेवा, NHEC कंपनीचे पुनरुज्जीवन आणि CRCS च्या पश्चिम विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनासह विविध विषयांवर त्यांनी भाष्य केले.
राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारताची बदनामी करू नये
राहुल गांधी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताबाबत टीका करत असल्याचा आरोप अमित शाह यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभरातून प्रशंसा मिळत असताना राहुल गांधी मात्र भारताच्या विकासाबाबत नकारात्मक चित्र मांडत असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसला पुन्हा निवडणुकांमध्ये यश मिळवायचे असेल, तर परदेशात जाऊन भारतावर टीका करण्याऐवजी देशातील नागरिकांमध्ये जाऊन काम करावे लागेल, असे शाह यांनी सांगितले.
पंढरपुरात विहीर खोदताना मोठी दुर्घटना; ढिगाऱ्याखाली 4 मजूर अडकले, बचावकार्य सुरु
भारताची लोकशाही, पंतप्रधान आणि देशाच्या प्रतिमेला आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनाम करण्याचा प्रयत्न जनता स्वीकारणार नाही. राहुल गांधी यांनी हीच भूमिका कायम ठेवली, तर काँग्रेसला पुढील 30 वर्षे सत्तेपासून दूर राहावे लागेल, अशी टीका त्यांनी केली.
मोदी सरकारने स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन केले
देशाच्या सहकार क्षेत्राबाबत बोलताना अमित शाह यांनी काँग्रेसच्या पूर्वीच्या सरकारांवरही निशाणा साधला. देशात सुमारे 70 वर्षांनंतर नरेंद्र मोदी यांच्या सरकारने स्वतंत्र सहकार मंत्रालय सुरू केले. महाराष्ट्रासह देशातील शेतकरी आणि सहकार क्षेत्रातील लोकांकडून अनेक वर्षांपासून अशी मागणी केली जात होती. मात्र, पूर्वीच्या सरकारांनी त्याकडे लक्ष दिले नाही, असा दावा शाह यांनी केला.
जिल्हा सहकारी संस्था, दूध संघ आणि साखर कारखान्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. साखर कारखान्यांना कर सवलत देण्यासारखे निर्णयही सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यातील CRCS कार्यालयामुळे सहकारी संस्थांवर लक्ष ठेवणे सोपे होणार
पुण्यात केंद्रीय सहकारी संस्था निबंधकांच्या (CRCS) पश्चिम विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयासाठी गुजरातमधूनही मागणी होती. मात्र, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हे कार्यालय पुण्यातच सुरू व्हावे, यासाठी आग्रह धरला होता, असे अमित शाह यांनी सांगितले.
अहिल्यानगर जिल्ह्याचा सुपुत्र हैदराबादचा पोलीस आयुक्त; महेश भागवत यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती
या कार्यालयाच्या माध्यमातून पश्चिम विभागातील बहुराज्यीय सहकारी संस्थांच्या कामकाजावर देखरेख ठेवली जाणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, दमण आणि दीव तसेच सिल्वासा परिसरातील संस्थांना प्रशासकीय आणि नियामक सेवा मिळवणे अधिक सोपे होणार आहे.
टॅक्सी चालकांच्या कमिशनला फाटा; ‘भारत टॅक्सी’ सेवा सुरू
खासगी टॅक्सी कंपन्यांकडून चालकांना मिळणाऱ्या मोबदल्याबाबतच्या तक्रारी लक्षात घेऊन केंद्र सरकारने ‘भारत टॅक्सी’ ही सहकारी तत्त्वावरील सेवा सुरू केली आहे. या व्यवस्थेत चालकांना केवळ कर्मचारी न मानता ‘सारथी भाई’ म्हणून सन्मान दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, या सेवेत कोणतेही कमिशन आकारले जाणार नाही. प्रवाशांकडून मिळणारे पैसे थेट चालकांच्या खात्यात जमा होतील, असे शाह यांनी सांगितले.
मुंबई आणि पुण्यात ही सेवा सुरू झाली असून, लवकरच कोल्हापूर, नागपूर, नाशिक आणि सोलापूरमध्येही तिचा विस्तार केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
47 संस्थांच्या मदतीने NHEC कंपनीचे पुनरुज्जीवन
तळेगाव दाभाडे येथे राष्ट्रीय अवजड अभियांत्रिकी सहकारी लिमिटेड (NHEC) कंपनीच्या नव्या प्रकल्पाचे भूमिपूजनही अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. एकेकाळी देशातील साखर कारखान्यांना यंत्रसामग्री आणि सेंट्रीफ्यूज पुरवणारी ही कंपनी आर्थिक अडचणींमुळे बंद पडली होती. कंपनीच्या मालकीची सुमारे 110 एकर जमीनही अतिक्रमणाच्या विळख्यात गेली होती.
भारताने न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका 3-1 ने जिंकली; पाचव्या वनडेत 22 धावांनी धूळ चारली!
या कंपनीला पुन्हा उभे करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला. तब्बल 47 संस्थांच्या सहकार्याने पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सुरुवातीला नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडे (NDDB) प्रशासकाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर NCDC, अमूल आणि सहकार क्षेत्रातील इतर संस्थांनी आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला.
9 ऑक्टोबर 2026 रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या पुनरुज्जीवनाचा निर्णय घेण्यात आला. डिसेंबर 2027 पर्यंत या कंपनीत उत्पादन सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचे अमित शाह यांनी सांगितले.
साखर कारखान्यांपुरते मर्यादित न राहता इतर उत्पादनांचीही निर्मिती
NHEC कंपनीत भविष्यात केवळ साखर कारखान्यांसाठी लागणारी यंत्रसामग्री तयार केली जाणार नाही. वीज निर्मिती, इथेनॉल, कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) आणि कंटेनर निर्मितीचे प्रकल्पही उभारले जाणार आहेत. रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असलेले कंटेनर आणि यंत्रसामग्री तयार करण्याचे नियोजन आहे.
एकेकाळी या कंपनीत तयार होणाऱ्या यंत्रसामग्रीची 11 देशांमध्ये निर्यात केली जात होती. आता नव्या प्रकल्पाच्या माध्यमातून कंपनीला पुन्हा सहकार क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र बनवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे शाह यांनी सांगितले.
शेणापासूनही शेतकऱ्यांना मिळणार उत्पन्नाचा नवा मार्ग
सर्क्युलर इकॉनॉमीच्या माध्यमातून उपलब्ध साधनसंपत्तीचा अधिकाधिक आर्थिक वापर करता येईल, असे अमित शाह म्हणाले. जनावरांच्या शेणापासून बायोगॅस आणि इतर उत्पादने तयार करून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवे मार्ग उपलब्ध होऊ शकतात. दूध उत्पादन वाढल्यास देशाचे आयातीवरील अवलंबित्वही कमी होण्यास मदत होईल.
कॉक्रोच जनता पार्टीला साथ देणारे सोनम वांगचुक प्रशासनाच्या कचाट्यात; आता थेट 60 दिवस नजरकैद
इथेनॉल, CBG आणि इतर सहकारी उद्योगांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न आहे. अमूल आणि इफकोप्रमाणेच NHEC कंपनीही सहकार क्षेत्रातील यशस्वी उदाहरण ठरेल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील शेतकरी आणि सहकार क्षेत्रातील प्रतिनिधींचे अभिनंदन केले.
