काँग्रेस पक्ष भाजपशी स्पर्धा करू शकत नाही असे समजू नका. 2024 मध्ये आम्ही भाजपचा पराभव करू, अशी गॅरेंटी मी तुम्हाला देतो, असे काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आव्हान दिले आहे. तर सर्व लोकांना एकत्र यावे लागेल, ही लढाई राहुल गांधींची नाही किंवा काँग्रेसचे नाही. ही देश वाचवण्यासाठी लढाई आहे, असे म्हणत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी सुरात सूर मिसळला. त्याचवेळी ‘आम्ही सगळे एकत्र आलो आहोत आणि आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास आहे. आता काय होईल, अशी भीती देशातील जनतेच्या मनात आहे, त्यामुळे घाबरू नका, आम्ही आहोत, याची जाणीव त्यांना करून द्यायची आहे, असा विश्वास शिवसेना (Uddhav) उद्धव ठाकरे यांनी दिला होता.
एका बाजूला सगळे विरोधक सत्ताधारी मोदी सरकारविरोधात इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकवटत आहेत. आपण भाजपला आणि मोदींना हरवू शकतो, अशी हमी कार्यकर्त्यांना देत आहेत. एकजूट दाखविण्यासाठी, रणनीती ठरविण्यासाठी बैठकांच्या माध्यमातून खलबत सुरु आहेत. हे सगळे चित्र एका बाजूला असतानाच मायावती यांच्या एका घोषणने या एकजुटीला आणि विरोधकांच्या विश्वासाला एक प्रकारे सुरुंगच लागल्याचे दिसून येत आहे. बहुजन समाज पक्षाच्या हत्तीच्या या चालीने इंडिया आघाडीतील नेतेही चिंतेत असल्याचे बोलले जाते. (Bahujan Samaj Party chief Mayawati has announced that she will contest the upcoming Lok Sabha elections on her own)
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी सोमवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दोन घोषणा केल्या. पहिली घोषणा केली ती आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याची. आणि दुसरी घोषणा केली ती निवडणूक निकालानंतरच्या शक्यता लक्षात घेऊन इंडिया आघाडी किंवा अन्य आघाडीत सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय घेण्याचा.
मायावती यांच्या या दोन्ही घोषणा इंडिया आघाडीसाठी चिंता वाढविणाऱ्या आहेत. मायावतींच्या या निर्णयामुळे विरोधी आघाडीचा खेळ बदलू शकतो, असे मानले जात आहे. याचे कारण म्हणजे देशात लोकसभेच्या सर्वाधिक म्हणजे 80 जागा उत्तर प्रदेशमधून येतात. बहुमताला आकडा लागतो 272. म्हणजेच बहुमताच्या जवळपास एक तृतीयांश जागा उत्तर प्रदेशमधून येतात. 2014 आणि 2019 मध्ये भाजपने इथून अनुक्रमे 71 आणि 62 अशा प्रचंड मोठ्या संख्येने जागा जिंकल्या होत्या. या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपला उत्तर प्रदेशने मोठी मदत केली होती.
आता उत्तर प्रदेशमधील प्रमुख पक्ष असलेल्या समाजवादी पक्ष, काँग्रेस यांनी एकत्र येत भाजपसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. याला मायावती यांची साथ मिळाली असती तर भाजपसाठी हे आव्हान डोंगराप्रमाणे मानले गेले असते. उत्तर प्रदेशमध्ये मायावती यांची मोठी ताकद आहे. किमान 20 टक्के मतदार त्यांच्या पाठिशी आहेत. सोबतच बसपा, सपा आणि काँग्रेस यांचा मतदारही एकच मानला जातो. पण आता मायावती यांच्या या घोषणेनंतर 80 जागांवर दुहेरी नाही तर तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळेच सपा-काँग्रेस आणि बसपा यांच्या मतविभागणी होण्याची शक्यता आहे. या मतविभागणीचा फटका बसून भाजपला पुन्हा बंपर जागा मिळण्याचा अंदाज आहे.
उत्तर प्रदेशशिवाय बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही मायावती यांची मोठी ताकद आहे. नुकत्याच पार पडलेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत बसपाने सात लाखांहुन अधिक मते मिळविली आहेत. यात दोन जागांवर विजयही मिळविला आहे. गत निवडणुकीत तर बसपाने 14 लाख मते मिळवत सहा जागांवर विजय संपादन केला होता. मध्य प्रदेशमध्ये 2018 च्या निवडणुकीत बसपाने तब्बल 20 लाख मते घेत दोन जागा जिंकल्या होत्या. तर 2023 मध्येही बसपा आणि सपाने काँग्रेसच्या पराभवाला हातभार लावला. बिहारमध्येही बसपला 2020 च्या निवडणुकीत सात लाखांच्या आसपास मते मिळाली होती. या मतांच्या जोरावर बसपला निवडून येण्यात अपयश येत असले तरीही या राज्यांमध्येही काँग्रेसला किंवा काँग्रेस राजदच्या युतीला फटका बसू शकतो.
थोडक्यात 2019 च्या लोकसभेत ज्याप्रमाणे महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा पराभूत करण्यात जी भूमिका बजावली होती, तशीच भूमिका आता उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यांमध्ये बहुजन समाज पक्ष बजावेल अशी भीती काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला जाणवत आहे. उत्तर प्रदेशमध्ये तिरंगी लढत झाल्यास तिथला निकाल विरोधकांसाठी खूपच धक्कादायक असेल असा अंदाज आतापासूनच राजकीय पंडीत वर्तवत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात 2014 सारखी तिरंगी लढत होईल आणि टीम मोदीला पुन्हा बंपर जागा जिंकण्यात यश येईल का? हत्तीची थेट चाल लोकसभेच्या विरोधकांची निवडणूक गणिते बिघडू शकेल का? असा सवाल उपस्थित होत आहे.
मायावतींच्या दुसऱ्या म्हणजे निवडणुकीनंतर आघाडी करण्याच्या घोषणेबाबतही विरोधकांना साशंकता आहे. कारण त्यांना जर भाजपला हरवायचे असते तर त्यांनी हा निर्णय घेतला नसता. जर भाजप पुन्हा सत्तेत आला तर मायावती सोबत येऊन काय फायदा असा सवाल इंडिया आघाडीतील नेते विचारत आहेत. पण 2024 च्या निवडणूक निकालानंतर, विरोधी आघाडी आणि एनडीए या दोन्हींसाठी आमचे दरवाजे खुले ठेवले आहेत, असा एक राजकीय संदेशही मायावती यांनी दिला असल्याचे बोलले जाते.