Download App

काका-पुतणे एकत्र येणार? रविंद्र क्षीरसागरांची जयदत्त क्षीरसागरांच्या कार्यक्रमाला हजेरी

बीड लोकसभा निवडणुकीनंतर क्षीरसागर काका पुतणे एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. आमदार संदीप क्षीरसागर अन् जयदत्त क्षीरसागर हा संघर्ष आहे.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Beed Politics : बीड जिल्ह्याच्या राजकारणात काका-पुतणे हा संघर्ष कायम पाहायला मिळतो. ताजा संघर्ष म्हणजे क्षीरसागर कुटुंबात तो आपल्याला पाहायला मिळाला. येथे पुतणे संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर यांच्यातील राजकीय वैर गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळालं. परंतु, लोकसभा निवडणुकीपासून ते संपुष्टात येणार? अशी जोरदार चर्चा सुरू आहे. (Sandeep Kshirsagar) नुकताचं जयदत्त क्षीरसागर (Jaydutt Kshirsagar) यांनी आयोजित केलेला कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यामध्ये संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांची उपस्थिती पाहायला मिळाली.

20 उमेदवार निवडून आले

बीडमध्ये 2016 पासून काका-पुतण्यामधील बेबनाव दिसून येत होता. तेव्हा झालेल्या नगर पालिका निवडणुकीत पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीशी दुरावा करत काकू-नाना विकास आघाडीच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांना नगर परिषद निवडणुकीत उमेदवाऱ्या दिल्या. या निवडणुकीत आपले 20 उमेदवार निवडूनही आणले होते.

राजकीय परिस्थिती बदलणार

पुढे २०१९च्या विधानसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी पराभव केला. या लढतीमध्ये संदीप यांना 99 हजार 934 तर जयदत्त क्षीरसागर यांना 97 हजार 950 मते मिळाली. साधारण दोन हजार मतांनी जयदत्त क्षीरसागर पराभूत झाले. जयदत्त क्षीरसागर यांचं घर फुटलं असलं तरी त्यांचे दुसरे लहान बंधू आणि जे मागील ३० वर्षांपासून बीड नगर पालिकेत नगराध्यक्ष आहेत, ते भारतभूषण क्षीरसागर त्यांच्यासोबत होते. तुलनेने संदीप क्षीरसागरांनी एकाकी झुंज दिली. आता पुन्हा एकदा राजकीय परिस्थिती बदलत आहे.

 क्षीरसागरांची भेटही घेतली

जयदत्त क्षीरसागर २०१९मध्ये शिवसेनेत गेले. परंतु, तिथे फार रमले नाहीत. २२ ऑक्टोबर २०२२ रोजी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. मागच्या दोन वर्षांपासून क्षीरसागर राजकीय विजनवासात होते. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी बजरंग सोनवणे यांना मदत केल्याची चर्चा आहे. तसंच, निवडून आल्यानंतर सोनवणे यांनी क्षीरसागरांची भेटही घेतली. त्यामुळे त्या चर्चेला अधिक उधाण आलं.

शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतात का?

बीडमध्ये आता पुन्हा राजकीय समीकरण बदलत आहे. विरोधात असलेला पुतण्या पुन्हा काकांसोबत येणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागरांच्या कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावली आहे. त्यामुळे क्षीरसागर शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतात का? हे पाहाणं महत्त्वाचं आहे. याशिवाय वेगळं काहीतरी समीकरण बीडमध्ये दिसेल का? हेदेखील मेळाव्यानंतर किंवा पुढच्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे.

 

जयदत्त क्षीरसागर यांची फेसबूक पोस्ट

योग्य वेळी, योग्य निर्णय घेणार. सध्याची राजकीय परिस्थिती खूप विचित्र असून पुढचा राजकीय प्रवास खूप विचारपूर्वक करायचा असून, भावनेच्या आहारी न जाता आपला सेवाभाव कायम ठेवून योग्य वेळी, योग्य निर्णय घेणार असल्याचं जयदत्त क्षीरसागर म्हणाले.
follow us

वेब स्टोरीज