मुंबई : शिवसेना पक्षाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अर्थ संकल्प अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला व्हिप बजावला आहे. हा आमदार शिवसेनेच्या एकूण ५५ आमदारांना लागू असून त्यात ठाकरे गटाच्या आमदारांनाही तो पाळावा लागेल. अन्यथा दोन आठवड्यानंतर काय कारवाई करायची याचा निर्णय घेऊ, असा इशारा देखील भरत गोगावले यांनी दिला.
राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सोमवार (दि. २७) पासून सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या वतीने सर्व आमदारांना व्हिप बजावण्यात आला आहे. पक्षाचे प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितले की, व्हिपचे पालन प्रत्येक आमदाराने करायचा आहे. एकूण ५५ आमदारांना हा व्हिप लागू आहे. त्यामध्ये आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांच्यासह ठाकरे गटाच्या इतरही आमदारांना बंधनकारक आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा व्हिप आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे इतर आमदार हा व्हिप पाळणार का, याकडे लक्ष लागले आहे. सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी यावरून काय घडामोडी घडणार आहेत, हे पाहणे औस्तुकतेचे ठरणार आहे.