Sudhir Mungantiwar on Eknath Shinde : महायुतीच्या सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार नाही. एक अनुभवी चेहरा देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात नाही. सहाजिकच याचं दुःख भाजपाच्या कार्यकर्त्यांना आहे. नाराजीही आहे. खुद्द मुनगंटीवार यांच्या विधानांतून ही नाराजी जाणवलीही आहे. परंतु, त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीची रेष सापडत नाही. याउलट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं. डिमोशन झालं. ते नाराज आहेत. त्यांची नाराजी त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतेय. बॉडी लँग्वेजही तशीच आहे. मग जे सुधीर मुनगंटीवार यांना जमलं ते एकनाथ शिंदेंना का जमलं नाही असा प्रश्न आहे. यावर सुधीर मुनगंटीवार लेट्सअप मराठीच्या मुलाखतीत बोलले आहेत. एकनाथ शिंदे नाराज आहेत असं मला वाटत नाही. पण, मी त्यांना नक्कीच विचारणार आहे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे आधी मुख्यमंत्री होते नंतर उपमु्ख्यमंत्री झालं. त्यांचे डिमोशन झालं. याकाळातील त्यांच्या चेहऱ्यावरून ते अतिशय नाराज दिसतात पण तुम्ही मात्र हसतमुख आहात. तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी तुमचा सल्ला काय आहे या प्रश्नावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘एकनाथ शिंदे आणि माझी काही भेट झालेली नाही. शिंदे चांगले व्यक्ती आहेत. ते नाराज आहेत असे मला वाटत नाही. पण ज्यावेळी भेट होईल तेव्हा मी त्यांना विचारेन की असं काही तुमच्या मनात आहे का?’ ‘मी फक्त माझी बॉडी लँग्वेज चांगली रहावी यासाठी काम करतोय दुसऱ्याची बॉडी लँग्वेज वाचण्याच्या फंदात मी पडत नाही.’ असे उत्तर देत या मुद्द्यावर त्यांना अधिक बोलणे टाळले.
एक मंत्रिपद रिक्त आहे त्यात तुमच्या नावाची चर्चा सुरुच असल्याचं सांगितलं जात आहे असे विचारले असता मुनगंटीवार म्हणाले, ‘तुम्हाला रिकामं मंत्रिपद दिसतंय त्यावर माझंही नाव दिसतंय मी ठरवून टाकलंय ‘उस गली में नहीं जाना जहां पे अपनी पर्वा नहीं’
आशिष शेलार यांच्याकडे तुमच्या सांस्कृतिक खात्याचा कारभार आलाय तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल. यावर ‘मी कधीही सल्ला देत नाही. पण त्यांनी विचारलं तर मी नक्की सांगेन. मोफतचा सल्ला द्यायचा म्हणजे यात अहंकार दिसतो. आशिष एक अतिशय उत्तम कार्यकर्ता आहे. स्वयंप्रकाशित आहे. त्याला मी सांगण्याची आवश्यकता नाही. मी तर चंद्रपुरचा आहे. आमच्यापेक्षा जास्त अनुभव हा मुंबईकरांना असतो. त्यामुळे मी त्यांना सल्ला देण्याची गरज दूर दूरपर्यंत नाही. पण जर एखाद्या गोष्टीबाबत माझं मत विचारलं तर मी निश्चितपणानं सांगेन’, असे मुनगंटीवार म्हणाले.
Video : वर्षभरात पावणे तीन कोटींचे पाच घोटाळे; दमानियांनी बाहेर काढले धनंजय मुंडेंचे ‘प्रताप’
‘आशिष (आशिष शेलार) हा माझा अतिशय जिवलग मित्र आहे. मी मंत्री झालो नाही म्हणून ज्यांच्या ज्यांच्या डोळ्यांत पाणी दिसतं त्यांच्यापैकी तो एक आहे. मग मी त्याला टोमणा कशाला मारेन. माझा मित्र आहे. तो आयुष्यात खूप मोठा व्हावा या माझ्या सदिच्छा आहेत. त्याच्या मोठेपणात मला आनंद वाटेल अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याबाबतचा जुना प्रसंग सांगितला.
वनखात्याबाबत तुमचं गणेश नाईकांना काही सांगणं आहे का यावर मुनगंटीवार म्हणाले, ‘मंत्री झाल्यावर मला गणेश नाईक यांचा एकदा फोन आला होता. तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. ते म्हणाले मला दोन तास वेळ द्या. मला तुमच्या अनुभवाची आणि सहकार्याची गरज आहे. ते ज्या मुद्द्यावर मला विचारतील त्याची माहिती मी नक्कीच त्यांना देईन’