Mla Shweta Mahale : राज्यात अत्याचाराच्या घटनांना केवळ सरकार जबाबदार नाही, असं अजब विधान भाजपच्या महिला आमदार श्वेता महाले (Mla Shweta Mahale ) यांनी केलंय. पुण्यातील नसरापूर चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावलीयं. राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांप्रकरणी विरोधकांकडून सातत्याने टीकेची झोड उठवली जाते. अशातच आता भाजपच्या आमदाराने केलेल्या अजब वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. हिवाळी अधिवेशनासाठी विधानभवनात आलेल्या आमदार श्वेता महाले यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.
मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर… एनटी रामारावांचा ‘तो’ प्रसंग अन् ठाकरेंचा फडणवीसांना पाठिंबा
पुढे बोलताना श्वेता महाले म्हणाल्या, एखादी घटना घडल्यानंतर सरकार काम करत असतं. एखादी घटना घडूच नये याचे संस्कार, प्रशिक्षण घरातील लोकं देत असतात. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारला जबाबदार म्हणून चालत नाही. आपल्या घरात मुलगा चुकीचा वागत असेल तर पहिलं काम कुटुंबातील लोकांचं असतं. त्यामध्ये सरकार नाही सांगणार की बाबा तू असं कर…तसं कर. प्रत्येकाला समाजाचं देणं आहे. त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे. जो सन्मान आपण आपल्या माता-भगिनींना देतो, तोच सन्मान इतरांनाही दिला पाहिजे, असं आमदार महालेंनी स्पष्ट केलंय.
यावेळी बोलताना आमदार महाले यांनी नसरापूर अत्याचार घटनेवरही आपली भूमिका मांडलीयं. नसरापूर घटनेप्रकरणी न्यायालयाच्या निकालाचं आम्ही स्वागत करतो. जनभावना पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडित कुटुंबियांना आरोपीला फाशीचीच शिक्षा मिळेल, असं आश्वासित केलं होतं. त्यासाठी सरकार म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आज या प्रकरणाचा निकाल लागला असून याबद्दल देवेंद्र फडणवीस यांच स्वागत करत असल्याचं महाले म्हणाल्या आहेत.
तसेच महिलांवरील अत्याचारांसह लाडकी बहिणींवरुन विरोधकांकडून सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. त्यावर बोलताना महाले म्हणाल्या, विरोधक लाडक्या बहिणींची योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले होते. महायुतीचं सरकार लाडक्या बहिणींना लाभ देणारच आहे. विरोध आपल्या स्वार्थासाठी आरोप करीत असून त्यांना अस्तित्व टिकवायचं आहे, परंतू लाडक्या बहिणी देवाभाऊंच्या सरकारसोबत ठामपणे असल्याचं आमदार महालेंनी स्पष्ट केलं. राज्यात सक्षम कायदे आहेत म्हणूनच आज नसरापूर घटनेचा निकाल लागला असून आरोपीला फाशीची शिक्षा झाली आहे. जर राज्यात सक्षम कायदे नसते तर आरोपीला शिक्षा झाली नसते. आजच्या निकालानंतर कायद्याची अंमलबजावणी झालीयं, असंही महाले यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली जात आहे. अशातच आता भाजपच्या आमदार महाले यांनी केलेल्या विधानावर विरोधक काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे.
