Download App

Ground Zero : इस्लामपूरमध्ये महायुतीत खळखळ… यंदाही जयंत पाटीलच आमदार?

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांच्या विरोधात भाजपचे निशिकांत पाटील, शिवसेनेचे गौरव नायकवडी आणि आनंदराव पवार यांना उमेदवारी हवी आहे.

जयंत राजाराम पाटील (Jayant Rajaram Patil). राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष. अनेक वर्ष ते राज्याचे अर्थमंत्री राहिले. शरद पवार (Sharad Pawar) यांनी जे गृहमंत्री अजितदादांनाही कधी दिले नाही त्या खात्याचे पाटील मंत्री राहिले. जलसंपदा, ग्रामविकास अशी मंत्रीपद त्यांना मिळाली. थोडक्यात अजित पवार (Ajit Pawar) यांच्यापेक्षाही जयंत पाटील यांना किंचित जास्त मिळालं असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. शरद पवार यांच्यानंतर आज राष्ट्रवादीत कोणाचा शब्द अंतिम असेल तर तो जयंत पाटील यांचाच. आज पश्चिम महाराष्ट्रात मास लिडर असलेले हाताच्या बोटावर मोजण्याइतके नेते राहिले आहेत. त्यात जयंत पाटील यांचं नाव घ्यावचं लागतं. (BJP’s Nishikant Patil, Shiv Sena’s Gaurav Nayakwadi and Anandrao Pawar want to contest against NCP’s Jayant Patil in Islampur assembly constituency.)

पण जयंत पाटील एवढे मोठे कशामुळे होऊ शकले? राज्याचे नेते कसे होऊ शकले? याचे उत्तर आहे मागच्या 35 वर्षांपासून त्यांनी इस्लामपूर मतदारसंघाची एकहाती ताब्यात ठेवलेली आमदारकी. 1990 मध्ये पहिल्यांदा निवडून आलेले पाटील आजतागायत इस्लामपूरचे आमदार आहेत. या काळात त्यांना अनेकांनी टक्कर दिली, त्यांच्या विरोधात फॉर्म भरला. पण पाटलांचे लीड कायमच 50 हजार प्लस राहिले. 2004 मध्ये त्यांचे सर्वाधिक 85 हजारांचे लीड होते. गत दोन निवडणुकीमध्ये त्यांचे लीड 75 हजार, 72 हजार असेच होते. थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांना पराभूत करु शकेल असा खमका चेहरा गेल्या 35 वर्षांत विरोधकांना चेहरा सापडलेला नाही. यंदा मात्र जयंत पाटील यांना पराभूत करण्यासाठी भाजप, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र येत फिल्डिंग लावली आहे.

नेमकी महायुतीने कशी फिल्डिंग लावली आहे? आणि या फिल्डिंगमधून जयंत पाटील गॅप शोधणार? की विकेट टाकणार? काय आहे इस्लामपूर मतदारसंघातील यंदाची स्थिती? पाहुया लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये…

राजारामबापू पाटील यांच्यानंतर जयंत पाटील यांनी इस्लामपूर-वाळव्याची सुत्रे ताब्यात घेतली. साखर कारखाना, दूध संघ या माध्यमातून मतदारसंघावर होल्ड तयार केला. अर्थात यासाठी शरद पवार यांनीही त्यांना महत्वाची सत्तास्थाने देत ताकद पुरविली. पण पाटील यांनीही मंत्री असताना, पक्षाचे काम करत असताना, राज्यभर फिरत असताना स्वत:च्या मतदार संघाकडे दुर्लक्ष होणार नाही याची खबरदारी घेतली आहे. विरोधक उभा राहु लागला तरी त्याचा टप्प्यात आणून कार्यक्रम करायचा याची हातोटी त्यांनी डेव्हलप केली.

Ground Zero : आष्टीत धस, धोंडे अन् आजबेंनाही ‘जरांगे फॅक्टर’चा धसका!

जयंत पाटील यांना मतदारसंघात पहिला धक्का बसला तो 2016 साली. भाजपच्या निशिकांत पाटील यांनी इस्लामपूर नगरपालिकेच्या थेट नगराध्यपदाची निवडणूक जिंकली. यासाठी जयंत पाटील विरोधकांची ताकद एकत्र झाली होती. यात आमदार सदाभाऊ खोत, विक्रम पाटील, महाडिक बंधू यांच्यासह राष्ट्रवादी सोडून सर्वच पक्षाचे नेते एकत्र आले होते.त्यानंतर भाजपनेही त्यांना ताकद देत सांगलीचे जिल्हाध्यक्षपद दिले. त्यामुळे निशिकांत पाटील हेच जयंत पाटील यांना फाईट देऊ शकतात असे दिसू लागले. यातूनच 2019 ची विधानसभा निवडणूक जयंत पाटील यांना जड जाऊ शकते असे बोलले गेले.

पण विधानसभेला विरोधक संघटित होत नाहीत हीच आमदार पाटील यांची जमेची बाजू म्हटली पाहिजे. जागा वाटपामध्ये इस्लामपूरची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. शिवसेनेने गौरव नायकवडी यांना उमेदवारी दिली. तर निशिकांत पाटील बंडखोरी करत अपक्ष मैदानात उतरले. यात जयंत पाटील एक लाख १५ हजार मते घेऊन विजयी झाले. तर निशिकांत यांना 43 हजार आणि नायकवडी यांना 35 हजार मते मिळाली होती. आमदार पाटील आणि विरोधी मतातील फरक 32 हजार मतांचा राहिला. यंदाच्या निवडणुकीतही स्थानिक पातळीवर महायुतीची एकी होणे हा या मतदारसंघातील सर्वात कळीचा मुद्दा आहे.

Ground Zero : तीन पराभवांचा वचपा बाकी… ‘शशिकांत शिंदे’ उसळी मारणार?

या निवडणुकीत पुन्हा एकदा निशिकांत पाटील हे भाजपकडून उमेदवार असण्याची शक्यता आहे. स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचा भावी आमदार असा शब्द सर्वांसमक्ष दिला आहे. पण त्यांच्या उमेदवारीला भाजपमधीलच काही नेत्यांचा विरोध आहे. लोकसभेला निशिकांत पाटील यांनी महायुतीचा प्रचार केला नसल्याचा आरोप करत भाजप आणि शिवसेनेतीलच नेत्यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. यात जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, विक्रम पाटील आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांचा समावेश होता. भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांनीही त्यांच्यावर तोंडसुख घेतले होते. याच सगळ्यांचा निशिकांत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध आहे. त्यांच्याऐवजी मतदारसंघ भाजपलाच घेऊन आनंदराव पवार आणि गौरव नायकवडी या दोघांनीही संधी मिळण्याची अपेक्षा ठेवली आहे.

एका बाजूला स्थानिक पातळीवर हा गोंधळ असतानाच महायुतीत वरिष्ठ पातळीवर इस्लामपूर काबीज करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. यासाठी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना पुन्हा विधान परिषदेवर आमदार म्हणून भाजपने संधी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सांगली जिल्ह्यात प्रवेश करताना आधी इस्लामपूर येथे भेट दिली आणि कार्यालयही सुरू केले. त्यामुळे यातून त्यांचीही दिशा स्पष्ट होते. आता यातून स्थानिक पातळीवरही कशी मोट साधली जाणार? की पुन्हा महायुतीत कोण बंडखोरी करणार आणि या मतविभाजनाचा फायदा जयंत पाटलांना होणार का? हे बघणे महत्वाचे असणार आहे.

जयंत पाटील यांना महाविकास आघाडीतून काही धोका होणार नाही ना? याचीही काळजी घ्यायची आहे. कारण सांगली लोकसभा मतदारसंघात ज्या घडामोडी त्यानंतर खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांच्या डोक्यात जयंत पाटील फिट बसले आहेत. इस्लामपूर-वाळवा मतदारसंघावर देखील आपले दसपटीने लक्ष राहील आणि या मतदारसंघात आता नवीन निर्णय घ्यावे लागतील, असे म्हणत यापूर्वी त्यांनी जयंत पाटील यांना अप्रत्यक्ष इशाराही दिला आहे. त्यामुळे ही दरी मिटवणे हे जयंत पाटील यांच्यापुढचे आव्हान असणार आहे. चुकूनच जर निशिकांत पाटील आणि विशाल पाटील यांची छुपी युती झाली तर ज्या प्रमाणे 1978 च्या निवडणुकीत वसंतदादा पाटील यांनी ठरवून राजारामबापू पाटील यांचा पराभव केला होता, त्या इतिहासाची पुनरावृत्तीही होऊ शकते. त्यामुळे इस्लामपूरच्या निकालाकडे यंदा संपूर्ण राज्याचे लक्ष असणार हे नक्की आहे.

follow us