Chandrashekar Bavankule : उद्धव ठाकरे यांनी घरात बसून निती अनितीच्या गप्पा मारु नयेत. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांची ज्वलंत मशाल मिठी नदीत विझवली. तसेच त्यांनी लोकशाही नाही तर घराणेशाही टिकवण्यासाठी ‘इस्ट इंडिया‘ कंपनीचं कडबोळं एकत्र केलं त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या तोंडून लोकशाही वाचवण्याच्या गप्पा ऐकणं म्हणजे विनोद आहे. अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीवर केली आहा. शिवसेनेच्या आवाज कुणाचा या पॉडकास्टसाठी ही मुलाखत घेण्यात आली. (Chandrashekar Bavankule Criticize Udhav Thackery on his interview )
तसेच ते पुढे ट्विटमध्ये देखील म्हणाले की, मी, माझा पेपर, स्वकियांशी माझा झालेला सामना, मीच संपादक, माझाच मुलाखतकार, माझीच मुलाखत… भन्नाट! हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांची ज्वलंत मशाल कलानगर शेजारील मिठी नदीत विझवून सोनिया गांधींच्या सेनेसमोर मुजरा करणारे उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करत आहेत. मोदीजी आणि अमित भाईंच्या नेतृत्वात देश सुरक्षित आहे.
उद्धव ठाकरे तुम्हाला तुमच्या आमदारांचं नेतृत्व करता आलं नाही. ते तुमच्या नाकर्तेपणामुळे नाकाखालून निघून गेले. मुख्यमंत्री असताना तुम्ही मातोश्री बाहेर पडले नाहीत आणि आता लोकांना दोष देत आहात. कुटनीतीला कुटण्याची भाषा तुम्हाला शोभत नाही. कारण २०१९ साली युतीत निवडणूक लढून तुम्ही महागद्दारी केली आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. तेव्हांच तुम्ही नितीमत्ता पायाखाली तुडवली होती. त्यामुळे घरात बसून निती-अनितीच्या गप्पा तुम्ही मारु नका.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय राऊत यांनी आवाज कोणाचा या पॉडकास्टसाठी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रदर्शित करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी भाजपसह अजित पवार गट, शिंदे गटावर घणाघाती टीका केली. राऊत यांनी या मुलाखतीत एनडीएच्या बैठकीबाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, गेल्या आठवड्यात बऱ्याच वर्षांनंतर या देशात एनडीए नावाचा काहीतरी अमिबा जिवंत आहे हे कळलं.