Download App

आम्ही सर्व क्लिन, एकाही मंत्र्यावर केस नाही; कारवाईच्या भीतीवर भुजबळांचे स्पष्टीकरण

Chhagan Bhujbal : महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन थेट सरकारमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 30 आमदार अजित पवार यांच्यासह राजभवनात उपस्थित होते. अजित पवारांनंतर छगन भुजबळ यांच्यासह 9 आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या बंडखोरीने विरोधकांना मोठा धक्का बसला. यावर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत. खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले, त्यांनाच मंत्रीपदाची शपथ दिली, अशी टीका केली. राऊतांच्या याच टीकेला आता छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) प्रत्युत्तर दिलं. (Chhagan Bhujbal on sanjay raut We are all clean not a single minister has a case of corruption)

अजित पवारांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यांनंतर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी छगन भुजबळ म्हणाले, आमच्यावर केसेस आहेत, म्हणून आम्ही सरकारमध्ये गेलो, हा आरोप साफ खोटा आहे. आज आमच्या ज्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली, त्या कुणावरही केसेस नाही. अजित पवारांवरील सर्व केसेस निल आहेत. त्यांना तर सरकारेच क्लिनचिट दिली होती. माझ्यावरही आता कुठली केस नाही. आदिती तटकरे, संजय बनसोडेंवर कुठला केस नाही. कुठल्याच प्रकरणात ते अडकलेले नाहीत. आम्ही सर्व क्लिन आहोत. आमच्या एकाही मंत्र्यावर केस नाही, असं भुजबळ म्हणाले.

Ajit pawar : शुक्रवारीच पदाचा राजीनामा दिला; बंडामागचं सत्य उघड करत अजितदादांचा गौप्यस्फोट! 

ते म्हणाले, आम्ही महाराष्ट्र सरकारचा तिसरा घटक म्हणून सहभागी झालो आहोत. पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक झाली. पण समन्वय होऊ शकला नाही. वास्तविक, शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की 2024 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील. आता तसं असेल तर सकारात्मक विचार घेऊन त्यांच्यासोबत गेलं पाहिजे असं वाटल्यानं सत्तेत गेला. मात्र, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोडलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सत्तेत सहभागी झालो आहोत. राज्यातील शेतकरी, बेरोजगारांचे प्रश्न सोडवायचे असतील, तर भांडून चालणार नाही. रस्त्य़ावर भांडून हे प्रश्न सुटणार नाहीत. सकारत्मकपणे काम करावं लागेल. हे प्रश्न सोडवायचे असतील तर केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय असायला हवा. सत्तेबाहेर राहून हे प्रश्न सुटणार नाहीत. म्हणून आम्ही सत्तेत सहभागी झाल्याचं भुजबळांनी सांगितलं.

 

Tags

follow us