Download App

Ground Zero : अरुणभाईंची जादू, पवार-ठाकरेंची साथ सोनवणेंचं काय होणार?

चोपडा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे चंद्रकांत सोनवणे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डी. पी. साळुंखे यांच्यात लढत होणार?

सातपुड्याच्या कुशीत आदिवासी पट्ट्याच्या पायथ्याशी वसलेला मतदारसंघ म्हणजे चोपडा. या मतदारसंघाची सामाजिक रचना जेवढी निराळी तेवढीच इथल्या मतदारांची समीकरणे निराळी आहेत. मागील अनेक निवडणुकीचा इतिहास बघितल्यास या मतदारसंघाने विधानसभेला राष्ट्रवादी (NCP) किंवा शिवसेनेला (Shivsena) मतदान केले आहे. पण लोकसभेला हा मतदारसंघ कायमच भाजपच्या (BJP) पाठीशी उभा राहतो. भाजपला भरभरुन मतदान होते. यंदाच्या निवडणुकीतही इथून भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना 64 हजारांचे लीड आहे. त्यामुळेच आता विधानसभेला काय होणार याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे… (Chopda Assembly Constituency fight between Chandrakant Sonwane of Shiv Sena against Dp Salunkhe Nationalist Congress Party Sharad Chandra Pawar)

काय होऊ शकते या निवडणुकीत आणि चोपड्यातून कोण इच्छुक आहेत पाहुया या व्हिडीओमधून.

चोपडा तालुक्याची एकूणच सामाजिक आणि सांस्कृतिक रचना वेगळी आहे. मराठाबहुल मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात गुजर समाजाचे मतदान असलेली बरीच गावे आहेत. रेवा गुजर आणि दोडे गुजर या दोन्ही समाजासह कोळी आमि आदिवासींची मतेही निर्णायक आहेत. असा हा मतदारसंघ 2014 पर्यंत हा मतदारसंघ म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हमखास निवडून येणारच असा होता. अलिकडील काळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अरुण भाई गुजराती यांचा हा बालेकिल्ला. 1985, 1990, 1995 आणि 1999 असे ते चारवेळा विजयी झाले. 2009 मध्ये मतदारसंघ राखीव झाल्यानंतरही राष्ट्रवादीच्या जगदीश वळवी यांनी विजय संपादन केला. पण 2014 मध्ये शिवसेनेतर्फे प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे आणि 2019 मध्ये लता सोनवणे या विजयी झाल्या. दोन्हीवेळी राष्ट्रवादीतर्फे जगदीश वळवी पराभूत झाले.

सध्या लता सोनवणे यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल वाद सुरु आहेत. त्यांचे जात प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द ठरवले. त्या सुप्रीम कोर्टात गेल्या अद्याप त्याचा निकाल लागणे बाकी आहे. 2019 मध्ये कोर्टाच्या निर्णायामुळे निवडणूक न लढवता आलेले माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यंदाची निवडणूक लढविण्यास तयार आहे. तथापि त्यांना पुन्हा कोर्टाची अडचण आलीच, तर लता सोनवणे याच उमेदवार राहतील. पण लता सोनवणे यांनाही जात प्रमाणपत्राची अडचण आली तर चंद्रकांत सोनवणे यांचे लहान बंधू आणि जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन शामकांत सोनवणे यांना उमेदवारी दिली जाईल, असे आजचे चित्र आहे.

Ground Zero : भाजप सुरेश भोळेंना रिप्लेस करणार? तीन ‘मराठा’ चेहरे चर्चेत

थोडक्यात शिवसेनेकडून कोणत्याही परिस्थितीत चोपडा विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत सोनवणे परिवारात उमेदवारी दिली जाईल हे निश्चित आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपचे जिल्हा परिषदचे तत्कालीन सभापती प्रभाकर गोटू सोनवणे यांनी बंडखोरी केली होती, भाजपने त्यांना छुपा पाठिंबा दिल्याची चर्चा होती. परंतु प्रभाकर सोनवणे तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. यंदाच्या निवडणुकीत जर मतदारसंघ भाजपला सुटला तर प्रभाकर गोटू सोनवणे हेच भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील एवढे मात्र निश्चित. या मतदारसंघात अजित पवारांची ताकद कमी आहे. त्यामुळे मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता ना के बराबरच आहे.

महाविकास आघाडीत चोपडा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संघटन मजबूत आहे. नेतेमंडळींची मोठी फौज आहे. माजी मंत्री अरुण भाई गुजराती, माजी आमदार आणि चोपडा सूत गिरणी संघाचे अध्यक्ष कैलास पाटील, ॲड. घनश्याम अण्णा पाटील यांच्यासारखी मातब्बर मंडळी आहेत. त्यामुळे शरद पवार गटाकडूनच या जागेवर उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. किंबहुना त्यांचाच उमेदवार शिवसेनेच्या उमेदवाराला चांगली टक्कर देऊ शकतो. ठाकरे यांचाही शिंदेंच्या उमेदवाराचा पराभव करणे हा त्यांचा हेतू आहे. त्यामुळे त्यांचीही मदत होऊ शकते.

मराठा चेहरा, एक गठ्ठा मतदान ‘महाजनांविरोधात’ पवारांच्या डोक्यात ‘खास’ प्लॅन

सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डी. पी. साळुंखे यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. माजी आमदार जगदीश वळवी यांचाही पर्याय आहे. मात्र परंतु ते चोपडा मतदारसंघात राहत नाहीत, त्यामुळे त्यांच्याविषयी चोपडेकरांच्या मोठ्या तक्रारी आहेत. डॉ. चंद्रकांत बारेला यांनी गतवेळीही निवडणूक लढवली होती. परंतु ते चौथ्या क्रमांकावर राहिले होते. यंदा डॉ. बारेला यांनीही तयारी सुरु केली आहे. त्यामुळे त्यांना ताकद दिल्यास तेही उमेदवार ठरु शकतात.

चोपडा मतदारसंघात  विकासाची प्रतीक्षा कायम आहे. मतदारसंघात मेगा रिचार्ज प्रकल्प प्रश्न मोठा आहे. शिवाय अंकलेश्वर-बुऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न ज्वलंत आहे. हा राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्गकडे वर्ग केला असूनही या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. चोपडा तालुका केळीचे उत्पन्न घेण्यात अग्रेसर आहे, पण केळीविषयी अनेक समस्या आहेत. गेल्या अनेक निवडणुकीत पीकविमा, केळ्याला फळाचा दर्जा, हमीभाव अशी आश्वासने दिली होती. पण ती पूर्ण झालेली नाहीत. कापसाला भाव नाही, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा, हे सर्व प्रश्न शेतकऱ्यांच्या तोंडी आहेत.

तरुणांसाठी एखादा मोठा प्रकल्प मतदारसंघात गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतिक्षेत आहे. त्यामुळे शहराकडे स्थलांतराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. या सगळ्या गोष्टी असूनही मतदारसंघात लोकसभेला भाजपला मतदान झाले आहे. संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने लाट असतानाच चोपडेकरांनी भाजपला मतदान केले होते. आता विधानसभेला काय होणार? अरुणभाई गुजराथी यांचे नेटवर्क भारी ठरणार की सोनवणेंची ताकद पुन्हा दिसणार हेच बघणे महत्वाचे आहे.

follow us