Eknath Shinde : छत्रपती संभाजीनगरच्या शिवसंकल्प मेळाव्यात बोलतांना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) जोरदार टीका केली. गद्दारांनी पक्ष चोरून विजय मिळवला. त्यांनी शिवसेना चोरली, धनुष्यबाण चोरलं. अरे चोरट्यांनो, तुमचा विजय हा खरा विजय नाही. तुमच्या पापाचा घडा भरला, अशी टीका ठाकरेंनी केली होती. त्या टीकेला आता मुख्यमंत्री शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं.
पाठीशी घालणार नाही, दोषींवर कडक कारवाई करणार; वरळी हिट अॅंड रणप्रकरणी CM शिंदेंची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना ठाकरेंनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता ते म्हणाले, लहान बाळासारखे किती वेळा रडणार? ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये लोकांनी त्यांना सहाव्या नंबरवर टाकले आहे. तर बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेला दुसऱ्या नंबरची मतं मिळाली आहेत. लोकसभेमध्येही लोकांनी उबाठाला हिसका दाखवून दिला आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षापेक्षा आम्हाला जास्त मते मिळाली. महायुतीला मिळालेल्या 19 टक्क्यांमधील 14 टक्के मतं आम्हाला मिळाली. आम्हीच खरी शिवसेना आहोत हे आता लोकांनीही शिक्कामोर्तब केले आहे, असं शिंदे म्हणाले.
चंद्रकांत पाटलांना नातेवाईक आणि सगेसोयरे यातील फरक कळतो का? जरांगे पाटलांचे टीकास्त्र
पुढं बोलतांना ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडल्याने लोकांनी आमच्या बाजूने मतदान केलं आहे. आम्ही लोकसभेत 13 जागा लढलो आणि 7 जागा जिंकलो. त्यांच्यापेक्षा दोन लाख मत आम्ही जास्त घेतले. ठाकरेंच्या सेनेचा स्ट्राईक रेट 42% होता तर आमचा 47% स्ट्राइक रेट आहे, असंही शिंदे म्हणाले.
पापाचा घडा कोणाचा भरला हे जनता दाखवेल
शिवसेनेचा मूळ मतदार हा धनुष्यबाणासोबत आहे, याची प्रचिती तुम्हाला विधानसभेत येईल. बाळासाहेबांचे विचार सोडून तुम्ही जी अभद्र युती केली, त्याचा परिणाम विधानसभेत भोगावे लागेल. पापाचा घडा कोणाचा भरला हे तुम्हाला विधानसभेत जनता दाखवेल, असा इशाराही शिंदेंनी दिला.
स्वतःच्या गेट बाहेर न येणारे शेताच्या बांधावर जाऊन भेटत आहे, याचा आनंद आहे, असा टोलाही शिंदेंनी लगावला.
तुमची दानत नाही…
पापाचा घडा लपवण्यासाठी सरकारवर त्यावर योजनाचं पांघरून घालतेय, अशी टीका ठाकरेंनी केली. त्याविषयी विचारलं असता शिंदे म्हणाले की, आम्ही महिला-भगिनींना लाडली बहीण योजनेअंतर्गत 18 हजार रुपये देत आहोत, तीन सिलेंडर मोफत देत आहोत. ही भावाकडून बहिणीला भाऊबीज आणि रक्षाबंधन भेट आहे. कारण आमच्या सरकारची देण्याची दानत आहे. तुम्ही तर काही दिलं नाही. कधी देण्याचा प्रयत्न केला नाही. तुमची देण्याची दानत नाही, अशी टीका सीएम शिंदेंनी केली.