प्रफुल्ल साळुंखे-विशेष प्रतिनिधी
Cabinet expansion : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार उद्या होणार असे रोज नवीन मुहूर्त समोर येत आहेत. विशेषता शिंदेंच्या शिवसेना आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराची घाई झाली आहे. शिंदे गटातील चाळीसच्या चाळीस आमदार हे मंत्रीपदाचे दावेदार आहेत. त्याच बरोबर मंत्रीपदावर अपक्ष आमदारांनीही दावा सांगितला आहे. अशा परिस्थितीमध्ये मंत्रिपद कुणाला द्यायचं हा प्रश्न एकनाथ शिंदे यांच्या समोर आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याप्रमाणे भाजपची अवस्था देखील काही वेगळी नाही. भाजपमध्ये निष्ठवंत आणि काँग्रेस, राष्ट्रवदीमधून आलेले असे दोन गट झाले आहेत. अशा दोन्ही नेत्यांमध्ये दिग्गज आणि माजी मंत्री असलेले कमीत कमी वीस जण आहेत.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा झालं तर जास्तीत जस्त 14 लोकांना संधी दिली जाऊ शकते. त्यात सात भाजप आणि सात शिवसेनेचे असतील. पुढच्या विस्तारात संधी देऊ असं आश्वासन द्यायचे असेल तर किमान 5 जागा या रिक्त ठेवाव्या लागतील. सात जागांवर शिंदे गटाच्या 25 आमदारांना कसं सांभाळायचे हा प्रश्न आहे. जर यातील सात जणांना मंत्रिपद मिळालं तर उर्वरीत आमदारांपैकी किमान 10 आमदार मूळ शिवसेनेत जाण्यासाठी तयार झाले तरी सरकारच्या अस्तिस्त्वाला धोका आहे.
देवेंद्र फडणवीसांचे नगरमध्ये रात्रीचे खलबते ! विखे-शिंदेंच्या वादाचे काय होणार ?
भाजपची परिस्थिती काही वेगळी नाही. आगामी वर्षभरात मुंबईसह 25 महापालिका, जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुक आहेत. प्रत्येक जिल्ह्यांत मंत्रिपदासाठी किमान दोन जण दावेदार आहेत. हे पाहता कुणाची नाराजी ओढवून घेणे आज भाजपला परवडणारे नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तार लवकर होईल असं जाहीर सांगितल्याने अनेकांच्या आशा उंचावल्या आहेत. यात मंत्रिपद मिळाल नाही तर नाराजी मोठी असणार हे नक्की आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तर पुण्याच्या कार्यकारिणीत अनेकांनी त्यागाची भावना ठेवावी असे जाहीर सुनावले आहे. या विधानावर आमदार ज्या रांगेत बसले होते त्या रांगेतून प्रतिसाद मिळाला नाही हे पाहता भाजपमध्ये देखील स्पर्धा तीव्र आहे हे नक्की.
लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप, तीन पक्षांचे चार फॉर्म्युले
मुख्यमंत्र्यांनी विस्तार होणार हे जरी सांगितले असले तरी भाजपाच्या गोटात आलेल्या बातमीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार शिवाय राज्यात विस्तार होणार नाही हे देखील समोर येत आहे. म्हणजेच विस्तार होणार असं सांगत नाराज आमदारांना बांधून ठेवणे. दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार हा केंद्र नेतृत्वाचा हिरवा कंदिल आल्याशिवाय नाही अशी दोन्ही भूमिका मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घेतली आहे का हा देखील प्रश्न आहे. पण सध्या तरी शिंदे गटाकडून बाशिंग बांधून अनेक तयार आहेत. तर नक्की काय होईल हे न समजल्याने भाजपात कमालीची शांतता आहे हे मात्र नक्की. सध्या चेंडू दिल्लीच्या कोर्टात आहे.