Download App

पुण्याचे ‘दादा’ अजित पवारच…बीडही आपल्याकडे घेत भाजपवर कसे वरचढ ठरले ?

उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) यांनी पुणे (Pune) आणि बीड (beed) जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद घेतले आहे. एक प्रकारे अजितदादा भाजपवर वरचढ ठरले आहेत.

  • Written By: Last Updated:

विष्णू सानप, प्रतिनिधी-पुणे
DCM Ajit Pawar get pune and beed Guardian ministers : महायुती सरकारची बहुप्रतिक्षित पालकमंत्र्यांची यादी आज अखेर जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये धक्कादायक म्हणजे मंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांना पालकमंत्रिपदावरून पत्ता कट करण्यात आला. त्यांच्या बीड जिल्ह्याचं पालकत्व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वीकारलं आहे. तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील अजित पवार यांच्याकडे आला आहे. यामुळे अजित पवारांकडे बीड (Beed) आणि पुणे या दोन जिल्ह्याचे पालकत्व आले आहे. मागील सरकारमध्ये पुण्याचे पालकमंत्रीपद अजित पवारांकडे होते. आताही ते पुन्हा पुण्याचे दादा ठरले आहेत.

वाल्मिक कराड ‘इफेक्ट’, धनंजय मुंडेंना मोठा धक्का, बीडचे नवे पालकमंत्री अजित पवार

पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार यावरून गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. याच कारण म्हणजे पुणे जिल्ह्याला चार मंत्रिपद मिळाले आहेत. यामध्ये अजित पवार, चंद्रकांत दादा पाटील, दत्तात्रय भरणे आणि राज्यमंत्री म्हणून पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांचा समावेश आहे. यामुळे पुण्याचे पालकमंत्री कोण होणार याबाबत अनेकांना उत्सुकता लागली होती. मात्र पुण्याचा दादा आपणच असल्याचं पुन्हा एकदा अजित पवारांनी दाखवून दिल आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणात सहा जणांना न्यायालयीन कोठडी; आरोपींना न्यायालयात का आणले नाही ?

अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये आपले आमदार घेऊन येत सामील झाल्यानंतर पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून मोठी खडाजंगी झालेली पाहायला मिळाली होती. मात्र गेल्या सरकारमध्ये देखील भाजपला एक पाऊल मागे घेत अजितदादांना पुण्याचं पालकमंत्रिपद द्याव लागलं होतं. मात्र आता सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रिपद आपल्याकडे ठेवेल असा कयास लावला जात होता. मात्र अजित पवारांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. चंद्रकांत पाटलांकडे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री देण्यात आला आहे तर माधुरी मिसाळ यांना कोल्हापूरचं सहपालकमंत्री पद देण्यात आलं आहे.

आजघडीला पुणे शहराला राज्य सरकारमध्ये चंद्रकांत पाटील आणि माधुरी मिसाळ हे दोन मंत्री तर केंद्रात मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने राज्यमंत्रीपद मिळाल आहे. असं असलं तरी देखील पालकमंत्री पद राष्ट्रवादीला सोडाव लागलं आहे.

पुणे भाजपला लॉंग टर्म चेहरा देण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. याचाच भाग म्हणून मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रिपद तर चंद्रकांत पाटील यांना पुण्यात आणलं गेलं तसेच सलग चार वेळा निवडून आलेल्या माधुरी मिसाळ यांचा देखील आदर भाजपकडून राखला गेला आहे. मात्र यांच्यामध्ये ताळमेळ घालणं भाजपसाठी आव्हान असणार आहे. याचं कारण याआधी पुणे भाजपला एकसंघ ठेवण्याची जबाबदारी स्वर्गीय गिरीश बापट हे बजावत होते. गेली महापालिकेची निवडणूक बापट यांच्या नेतृत्वात लढवली गेली होती. मात्र आता पुणे शहर भाजपामध्ये तीन मंत्रीपद असल्याने पुणे भाजपचा कारभारी कोण असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे.

अलीकडचं उदाहरण द्यायचं झाल्यास काही दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेच्या विकासकामाचा आढावा बैठक महापालिकेत घेतली त्यावेळी या बैठकीला मंत्री माधुरी मिसाळ उपस्थित नव्हत्या त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी स्वतंत्र महापालिकेमध्ये बैठक घेतली यानंतर पुणे भाजपचा कारभारी कोण? अशा चर्चा दबक्या आवाजात सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, पुण्याच्या पालकमंत्री पदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती.मात्र गेल्या सरकारचा पॅटर्न राबवत पुन्हा एकदा अजित पवार यांच्याकडे पुण्याच पालकत्व देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. तर भाजप मंत्र्यांनी पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करावं, असा मेसेज अप्रत्यक्षरीत्या दिल्याचे बोलले जात आहे.

बीडचे पालकमंत्रीपद किती दिवस अजितदादांकडे राहिल ?

दरम्यान, अजित पवारांचे विश्वासू म्हणून ओळख असलेले मंत्री धनंजय मुंडे यांना सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी त्यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड याला अटक करण्यात आल्या प्रकरणी त्यांना पालकमंत्री दिलं नसल्याचं स्पष्ट दिसत आहे. जनभावनेचा आदर करत धनंजय मुंडे यांच्या वाट्याचं बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्याचं बोललं जात आहे. बीडचे पालकमंत्रीपदावरून वाद होता. बीडचे पालकमंत्रिपद भाजपच्या मंत्र्यांकडे जावे, असे भाजपच्या काही नेत्यांना वाटत होते. परंतु बीडमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने अजितदादांनी हे पालकमंत्रिपद आपल्याकडे घेत महायुतीतील आपले वजन राखले आहे. आता किती दिवस अजित पवार पुण्यासह बीडचे पालकत्व स्वीकारतात की संतोष देशमुख हत्या प्रकरण शांत झाल्यानंतर धनंजय मुंडे पालकमंत्री पद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us