अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली जिल्हा सहकारी बँकेची सत्ता भाजपने आपल्या ताब्यात घेतली आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) हे शनिवारी (दि. 11 मार्च) अहमदनगरच्या दौऱ्यात येत आहेत. ते कर्जतमध्ये येत आहेत. जिल्हा बँकेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना फडणवीस यांनी धक्का दिलाच आहे. त्यानंतर आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात फडणवीस येत आहेत. फडणवीसांच्या उपस्थित काही जणांचे पक्षप्रवेश आमदार राम शिंदे (Ram Shinde) हे घडवून आणत आहेत. त्यामुळे काकांना धक्का दिल्यानंतर पुतण्याला घेरण्याची रणनीती भाजपची आहे.
अहमदनगर दक्षिण हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. २०२४ च्या निवडणुकीसाठी नगर जिल्ह्याची जबाबदारी ही फडणवीस यांच्याकडे आहे. राष्ट्रवादीची ताकद कमी करण्यासाठी भाजप कामाला लागली आहे. याची झलक दोन दिवसांपूर्वीच अहमदनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या वेळी दिसून आली.
हेही वाचा : Devendra Fadnavis : गिरीश महाजन, गुलाबरावांनी त्रास देऊ नये म्हणून माझं खडसेंवर लक्ष
फडणवीस यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय पाटील यांनी जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या ताब्यातून हिसकावून घेतली. माजी आमदार शिवाजी कर्डिले हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले. कर्डिले यांनी फडणवीस, विखे यांच्यामुळे अध्यक्ष झाल्याचे सांगितले. जिल्हा बँकेची सत्ता हातातून जाणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का आहे.
राष्ट्रवादीचे नेते हा धक्का विसरत नाहीत तेच उपमुख्यमंत्री फडणवीस हे नगरच्या दौऱ्यावर येत आहेत. शिंदे यांनी कर्जतला शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. महसूलमंत्री, पालकमंत्री राधाकृष्ण विखे उपस्थित राहणार आहेत. शेतकरी मेळावा असला तरी राष्ट्रवादीला आणखी राजकीय धक्के देण्याची ही तयारी आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी झाली आहे.
हेही वाचा : काँग्रेसमध्ये होणार फेरबदल ? ; नाना पटोलेंनी दिले थेट उत्तर..
काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले यांच्यासह कर्जत-जामखेड मतदारसंघातील इतर पक्षातील आजी-माजी राजकीय पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. आगामी जिल्हा परिषदेसह इतर निवडणुकीच्या दृष्टीने आमदार राम शिंदे यांनी ताकद वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एकाप्रकारे आमदार रोहित पवार यांना जोरदारपणे घेरण्याची ही राम शिंदे यांची रणनीती दिसून येत आहे.