Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्याकाही दिवसांपासून महायुतीवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तीन मार्चपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session) पार्श्वभूमीवर स्वतःकडे असलेल्या तीन महत्त्वाच्या खात्यांचे विधिमंडळातील उत्तरदायित्व आपल्या सहकारी मंत्र्यांकडे सोपवले आहे.
नगरविकास विभागाच्या प्रश्नांची उत्तरे मंत्री उदय सामंत (Uday Samant) , सार्वजनिक उपक्रम (एमएसआरडीसी) विभागाच्या प्रश्नांची उत्तरे दादा भुसे, (Dada Bhuse) तर गृहनिर्माण विभागाच्या प्रश्नांची उत्तरे शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) देतील. यामुळे शिंदे यांनी विधिमंडळाच्या कामकाजापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. तीन मार्चपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात नगरविकास आणि एमएमआरडीए विभागांतील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
मुंबई मेट्रो प्रकल्पातील कथित लाचखोरी प्रकरण गाजण्याची शक्यता असून, फ्रान्सच्या एका कंपनीने एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांवर बिल मंजुरीसाठी लाच मागितल्याचा आरोप केला आहे. यामध्ये नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळेच शिंदे यांनी या प्रश्नांपासून लांब राहण्यासाठीच सहकारी मंत्र्यांना जबाबदारी दिली का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिंदे गटात सध्या अस्वस्थता वाढत असून, पक्षातील अनेक आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळेच विधिमंडळात होणाऱ्या वादग्रस्त चर्चांपासून स्वतःला दूर ठेवत शिंदे गटाच्या अंतर्गत राजकारणावर लक्ष केंद्रित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का? अशी देखील शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.
वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलपूर्वीच मोठा धक्का, स्टार सलामीवीर जखमी
भ्रष्टाचाराच्या आरोपांपासून स्वतःला वाचवण्यासाठी शिंदे यांनी महत्त्वाच्या खात्यांच्या प्रश्नोत्तरांपासून माघार घेतली का? हे अधिवेशनातील चर्चेत स्पष्ट होईल. मात्र, शिंदेंची ही खेळी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे.