“शरद पवार गेल्या वर्षी चौंडीला गेले. इतक्या वर्षात त्यांना चौंडी दिसली नाही. चौंडीमध्ये आम्ही त्यांना सांगत होतो, तुमचं सरकार आहे, सत्ता आहे. माज करू नका. आजोबा आणि नातवाला आम्ही ३१ मे ला मी सांगत होतो माज करू नका. ही पुण्यश्लोक आहिल्यादेवींची भूमी आहे. त्यांनी ते ऐकलं नाही आणि २० तारखेला त्यांचं सरकार पडलं.” अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
धनगर समाजासाठी अर्थसंकल्पामध्ये घोषित केलेल्या योजनांमुळे मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी गोपीचंद पडळकर बोलत होते. त्यावेळी पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आणि विरोधी पक्षावर हल्लाबोल केला.
हेही वाचा : शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणाऱ्या कृषी मंत्र्या विरोधात, महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक
यावेळी गोपीचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. ते म्हणाले, पहिला धनगर समाजातला खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या रूपाने दिल्लीला पाठवला, महादेव जानकर, राम शिंदे यांना कॅबिनेट मंत्री केलं. हा देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाचा केलेला सन्मान आहे. सोलापूर विद्यापीठाची २००४ साली स्थापना झाली. त्यानंतर अनेक आंदोलने झाली पण कोणीही त्याचा निर्णय घेतला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी २०१८ मध्ये सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांच नाव देण्याचा निर्णय घेतला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, “ज्यांनी ज्यांनी आमचा सन्मान केला त्यांच संरक्षण करण्याची जबाबदारी आहे. भाजप सरकारने आमचा सन्मान केला. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत.” धनगर समाजासाठी दहा हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. तो गरजू लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम तरुण लोकांनी केलं पाहिजे. असंही पडळकर यावेळी म्हणाले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आपण सरकारला लोककल्याणकारी राज्य म्हणतो. पण गेल्या ७५ वर्षात जर विकास सामान्य लोकांपर्यंत पोहचला नाही तर याला लोककल्याणकारी राज्य कसं म्हणायचं?” असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विचारला.