मुंबई : राज्यात शिवसेनेतील बंडानंतर खरी शिवसेना कोणाची हा वाद उपस्थित झाला आहे. यातच आज महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. दरम्यान हे प्रकरण आता 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्याची मागणी सुप्रीम कोर्ट मान्य करणार का? की या प्रकरणात आणखी काही नवा ट्विस्ट येणार याचं उत्तर आज मिळणार आहे.
तत्पूर्वी ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई, सुनील प्रभू यांनी शिवसेनेतून फुटून निघालेल्या आमदारांच्या अपात्रतेसाठी तसेच राज्य सरकारच्या घटनात्मक वैधतेसह अन्य मुद्द्यांना आव्हान देणाऱ्या याचिका सादर केल्या आहेत. तर दुसरीकडे आमदार अपात्रतेच्या नोटिसा, शिवसेना विधिमंडळ नेतेपदावरून दूर करण्याचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय यासह काही बाबींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार भरत गोगावले आदींनी आव्हान दिले आहे.
पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी
राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुरु आहे. यामध्ये सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांचा समावेश आहे.
BJP Vs NCP : पहाटेच्या शपथविधीवरुन राष्ट्रवादी-भाजपमध्ये ट्विटर वॉर
दरम्यान हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे द्या अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. हे प्रकरण जर 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे गेलं तर निकालाला आणखी वेळ लागेल. जर सध्याच्याच घटनापीठाकडे राहिलं तर मग सलग सुनावणी तातडीनं सुरु होणार का याचीही उत्सुकता असेल.
सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाच्या यादीत आज पहिल्याच क्रमांकावर हे प्रकरण आहे. या घटनापीठाकडे सध्या तीन विषय होते. त्यातल्या दिल्ली आणि केंद्र सरकारच्या अधिकारातल्या संघर्ष प्रकरणाची सुनावणी पूर्ण झालीय. तर एनआरसीचं प्रकरण नंतर ठेवलं गेलंय. त्यामुळे सध्या या घटनापीठाची प्राथमिकता महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण दिसतंय.