सपने नही हकीकत बुनते है… लोकसभा निवडणूक जवळ येताच भाजपने आगामी निवडणुकांसाठी आपले स्लोगन जाहीर केले. ‘अबकी बार मोदी सरकार’ जसे प्रभावी ठरले तसेच हे स्लोगन प्रभावी ठरण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. मित्र पक्षांना सोबत घेतले, राज्य प्रभारींची घोषणा झाली. प्रचारही सुरु झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राम मंदिराची (Ram Mandir) उभारणी करुन निवडणुकीचा प्रचाराचा अजेंडा सेट केला. ते नियमित वेगवेगळ्या राज्यांचा दौरा करत असून प्रचार सुरुच आहे. एकूणच भाजपने आता फक्त उमेदवारांची घोषणा करणे इतकेच बाकी ठेवल्याची चर्चा आहे.
त्याचवेळी इंडिया आघाडी मात्र मित्र पक्ष संभाळण्यात अडकली आहे. आम आदमी पक्ष (Aam Aadami), तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) सोडून गेल्यात जमा आहे. ज्या नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी इंडिया आघाडी स्थापन करण्यासाठी पहिला प्रस्ताव ठेवला तेच नितीश कुमार भाजपसोबत (BJP) गेले. इतर ठिकाणी अद्याप जागा वाटप, उमेदवार निवडणे, प्रचाराची दिशा ठरविणे अशाच गोष्टी होणे बाकी आहे. काँग्रेसच्या राहुल गांधी यांना इंडिया आघाडीचा सर्वात मोठा चेहरा मानला जात आहे. पण ते सध्या भारत जोडो न्याय यात्रेत अडकले आहेत. प्रचाराचा अजेंडा सेट झालेला नाही. त्याचमुळे इंडिया आघाडी मागे पडल्याची चर्चा आहे. नेमकी भाजपने कशी आणि किती तयारी केली आहे आणि इंडिया आघाडी कुठे, कशी मागे पडली आहे, पाहुया.
भाजप सतत निवडणुकांच्या मूडमध्ये असतो, असे म्हटले जाते. पण या मूडचा त्यांना फायदाही होताना दिसतो. एकदा निवडणूक झाली त्याचा निकाल लागला की पुढच्या निवडणुकीची तयारी सुरु होते. विजय झाला तर गुलाल उधळतात, पराभव झाला तर चिंतन करतात अन् दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागतात. 2024 च्या लोकसभेला देशात आणि महाराष्ट्रात भाजपने अशीच तयारी सुरु केली आहे.
भाजपचे प्रचाराचे स्लोगन ठरले आहे. दोन वर्षांपूर्वीच निवडणूक प्रभारी नेमले. हे प्रभारी केवळ राज्यामध्येच नाही तर प्रत्येक लोकसभा आणि प्रत्येक विधानसभा निवडणूक मतदारसंघांमध्ये नेमले. मतदारसंघ निवडणूक प्रमूख म्हणून तिथल्या स्थानिक नेत्यांना जबाबदारी देण्यात आली. यातून तीन गोष्टी साध्य झाल्या. भाजपला तिथून कोण उमेदवार असू शकतो याची चाचपणी करता आली. जबाबदारी दिलेलेच उमेदवार असू शकतात अशी चर्चा झाल्याने त्यांनीही मतदारसंघ बांधणीला सुरुवात केली. मतदारांपर्यंत चेहरा पोहचविणे सोपे झाले.
भाजपला साधारण दोन वर्षांपूर्वीच विरोधक एकवट आहेत त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुका जड जाऊ शकतात असे असल्याचे संकेत मिळाले. हा अंदाज येताच भाजपचे रणनीतीकार कामाला लागले.
राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड,हरियाणा या राज्यांमध्ये भाजप स्वबळावर सत्तेत आहे. इथे भाजपचा थेट सामना केवळ काँग्रेससोबत आहे. तर बिहार, महाराष्ट्र या राज्यांमध्ये सर्वात मोठा पक्ष आहे पण मित्र पक्षांशिवाय काम भागत नाही. इतर म्हणजे, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा, पंजाब या राज्यांमध्ये काँग्रेस आणि स्थानिक पक्षांचेही आव्हान आहे. यातील उत्तर प्रदेश वगळता अन्य राज्यांमध्ये भाजप सत्तेच्या बाहेर आहे. पण या प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळी रणनीती आखली.
उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा या राज्यांमध्ये आपली ताकद कायम ठेवणे हे भाजपचे टार्गेट आहे. पश्चिम बंगाल, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, आंध्र-प्रदेश, ओडिसा, पंजाब या राज्यांमध्ये भाजपची ताकद थोडी आहे किंवा नसल्यासारखीच आहे. त्यामुळे या राज्यांत ताकद वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. त्यातून इथे भाजपने स्वबळावर लढण्याचा सूर आळवलेला दिसतो. राहिला प्रश्न कर्नाटक, महाराष्ट्र, बिहार या राज्यांचा. तर या राज्यांबाबत भाजपने दोन वर्षापूर्वीपासूनच काम सुरु केले.
इथले प्रदेशाध्यक्ष बदलणे, राज्यात सत्ता नसली तरी केंद्राच्या माध्यमातून नेत्यांना ताकद देणे, संघटनेतील किंवा सभागृहातील पदे देत जबाबदारी देणे, जातीय समीकरणे बांधणे इथे कोणत्या मित्रपक्षांसोबत घेता येईल याचा विचार करणे अशा उपक्रमांना सुरुवात केली. कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये मोठा पराभव होताच भाजपने लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने आडमुठी भूमिका न घेता धर्मनिरपेक्षा जनता दलाला सोबत घेतले. जाहीर केले नसले तरी लोकसभांचे जागा वाटपही झाल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्रात आधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेला आणि त्यानंतर अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीला सोबत घेतले. त्यानंतर नुकतेच बिहारमध्येही लांब गेलेल्या नितीश कुमार यांना सोबत घेतले. भाजप तिन्ही राज्यांत मोठ्या भावाची भूमिका बजावत आहे. पण रणनीतीचा भाग म्हणून आडमुठी भूमिका न घेता महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदी बसवले, बिहारमध्ये नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवले.
एका बाजूला भाजपची ही तयारी असतानाच इंडिया आणि महाविकास आघाडी मात्र चर्चांच्या गुऱ्हाळातच अडकली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने इंडिया आघाडीने मागील वर्षभरापासून तयारी सुरु केली आहे. पाच ते सहा विविध शहरांमध्ये बैठका झाल्या. चर्चांच्या अगणित फेऱ्या झाल्या. पण अजूनही जागा वाटपाचे गणित मार्गी लागलेले नाही. यात काँग्रेस पक्षाची आडमुठी भूमिका असल्याचे बोलले जाते. हा प्रश्न मार्गी लावायचे सोडून राहुल गांधी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भारत जोडो न्याय यात्रेत अडकले आहेत.
काँग्रेसच्या याच भूमिकेमुळे पंजाब आणि दिल्लीत आम आदमी पक्षाने स्वबळाचा सूर आळवला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनीही स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. तर नितीश कुमार यांनीही भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतली. महाराष्ट्रातही महाविकास आघाडी चर्चांच्या गर्तेत अडकली आहे. वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वराज्य संघटना या तिन्ही पक्षांचा महाविकास आघाडीत प्रवेश होण्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्या एन्ट्रीसाठी सुरु असलेल्या चर्चांच्या फेऱ्या अद्यापही सुरु आहेत.
मागील जवळपास वर्षभरापूर्वी वंचित बहुजन आघाडीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटासोबत युती केली. त्याचवेळी त्यांनी इंडिया आघाडीत घ्या, म्हणून प्रस्तावही दिला. भाजपविरोधात आपण एकत्र येऊ अशी साद घातली. पण वर्ष उलटले तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट चर्चा सुरु आहे, योग्य वेळी निर्णय घेऊ, अशी आश्वासने दिली जात आहेत. एका टप्प्यानंतर पवारांनी आपली हरकत नसल्याचे म्हणत चेंडू काँग्रेसच्या कोर्टात ढकलला.
काँग्रेसने नुकतीच वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा कोणी करायची यासाठी समितीची स्थापना केली आहे. आता अवघ्या दोन महिन्यांवर निवडणुका आल्या असतानाच अजुनही चर्चांच्या फेऱ्या होणार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने हातकणंगलेत राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली आहे. मात्र अद्यापही अधिकृत घोषणा झालेलीच नाही. काँग्रेसने स्वराज्य संघटनेच्या संभाजीराजे छत्रपतींशी चर्चा सुरु केली आहे. तिथेही ठोस अजूनही काहीच हाती नाही.
या सर्वांमुळेच महाविकास आघाडीकडून कुठून कोण उमदेवार असणार हे अजून गुलदस्त्यातच आहे. आता चर्चांच्या फेऱ्या संपणार, त्यानंतर जागा कोण लढणार याबाबताच निर्णय होणार, त्यानंतर उमेदवार कोण असणार हे ठरणार. तिथून उमेदवाराने तयारीला सुरुवात करायची, मतदारसंघात आपला चेहरा, पक्षाचे नाव. चिन्ह पोहचवायचे, आपण काय करणार हे मतदारांपर्यंत पोहचवायचे. याच तुलनेत भाजप बरीच पुढे असल्याचे दिसून येते. कदाचित हेच भाजपच्या विजयाचे आणि महाविकास आघाडीच्या पराभवाचे कारण असावे.