Download App

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलिसांचा ‘तो’ रिपोर्ट फेटाळला

  • Written By: Last Updated:

पुणे : फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. पुणे पोलीसांचा क्लोजर रिपोर्ट पुणे न्यायालयाने फेटाळला आहे. राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा गंभीर आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर होता. राज्यात सत्ताबदल होताच रश्मी शुक्ला यांना क्लिन चिट देण्यात आली होती. या संदर्भात पुणे पोलीसांनी क्लोजर रिपोर्ट पुणे न्यायालयात सादर केला होता. परंतु, न्यायालयाने तो आज फेटाळून लावला आहे. न्यायालयाचा हा निर्णय शिंदे -फडणवीस सरकारला धक्का मानण्यात येत आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, आमदार आशिष देशमुख, खासदार संजय काकडे, एकनाथ खडसे यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्याचे फोन टॅपिंग केले होते. यानंतर फेब्रुवारी महिन्यात फोन टॅपिंग प्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलिसात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. याचा शहर पोलिस तपास करत होते.

दरम्यान, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या सध्या हैदराबादमध्ये कार्यरत आहेत. सत्तातंरानंतर त्या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्या होत्या. तर, दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रश्मी शुक्ला यांची भेट झाल्याची माहिती मिळाली होती. यामुळे आता अनेक चर्चा रंगल्या होत्या.

Tags

follow us