Download App

गोगावलेंचा whip रद्द ; जयंत पाटील यावरच खूश

Jayant Patil Said Even if the Shinde government survives, they have no moral right to remain in power : महाराष्ट्र सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निकाल दिला आहे. महाराष्ट्रातील सत्ताबदलाच्या काळात घेतलेल्या विविध निर्णयांवर न्यायालयाने आपली निरीक्षणे नोंदवली आहेत. शिंदे गटाला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. त्याचवेळी न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवले असून त्यांनी यावर शक्य तितक्या लवकर निर्णय घ्यावा, असेही कोर्टाने सांगितलं. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोर्टाच्या या निकालानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

शिंदे सरकार जरी वाचले तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असे मत जयंत पाटील सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, राज्यपालांनी घेतलेले निर्णय कसे चुकीचे आहेत यावर कोर्टानं भाष्य केलं. भरत गोगावले यांचा whip अमान्य केला असल्याने विधानसभेतील शिवसेनेच्या सदस्यांनी जी कृती केली ती अवैध ठरणार आहे. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांना निर्णय घेताना सुप्रीम कोर्टाने ज्या मुद्यांची नोंद केली, त्या चौकटीत राहून काम करावे लागेल. यामध्ये विधानसभाध्यक्ष वेळकाढूपणाचे धोरण करू शकणार नाही, असेही पाटील म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकार थोड्या दिवसांचं; सर्वोच्च निकालानंतर अनिल परबांनी सांगितली रणनीती

पाटील यांनी सांगितले की, शिंदे सरकार वाचले हा सत्तेच्या भोवती गोळा झालेल्यांचा क्षणिक आनंद राहू शकतो. कसेबसे शिंदे सरकार वाचले ही आनंदाची भावना त्यांची राहू शकते. पण हे सर्व अवैध, घटनाबाह्य आहे. यातून भाजपने महाराष्ट्रात केलेली कृती कशी चुकीची आहे. तसेच घटनेची पायमल्ली कशाप्रकारे झाली हे राज्यातील जनतेला आज कोर्टाने सांगितल्याचं पाटील म्हणाले.

राज्यातील सर्व राजकीय परिस्थिती पाहून उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर मविआला पुन्हा सत्तारूढ होण्याचीॉ संधी मिळाली असती असे कोर्टाने सांगितले. यातून सुप्रीम कोर्टाच्या मनात काय होते हे स्पष्ट होते असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

यावेळी बोलतांना पाटील यांनी तत्कालीन राज्यपाल यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, तत्कालीन राज्यपालांना जसा माणूस भेटेल तसे ते मार्गदर्शन करत होते. राज्यपाल स्तरावरील व्यक्तीबद्दल असे बोलणे योग्य नसले तरीही त्यांची चोवीस तास अशीच भूमिका होती. त्यांना योग्य संधी मिळाली तेव्हा कायद्याची पायमल्ली करून आमचे सरकार घालवण्यासाठी त्यांनी मोठा हातभार लावला, असा थेट आरोप जयंत पाटलांनी केला.

सध्या अस्तित्वात असलेललं राज्यातील सरकार हे बेकायदेशीर आहे हे आज कोर्टात सिद्ध झालं. त्यामुळं सध्या राज्यात सत्ता कोणाची हे जनतेला महत्वाचे नाही. या निर्णयामुळे राज्यातील जनता मविआच्या मागे खंबीरपणे होती. त्याला आता अधिकची शक्ती मिळेल, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

कोर्टाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करणे जास्त अन्यायकारक होईल असं वाटते, असा मिश्किल टोला लगावतांनाच ज्यावेळी त्यांनी सरकार स्थापन केले त्यावेळी कोणतीही नैतिकता नव्हती. त्यामुळे पुन्हा त्यांच्यावर नैतिकतेबद्दल बोलणे योग्य वाटत नाही, असं पाटील म्हणाले.

 

Tags

follow us