Jitendra Awhad on Gokul Milk Union: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमधील सत्तासंघर्ष आता चांगलाच तापला आहे. निवडणुकीत सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने बहुमत मिळवल्यानंतर राज्य सरकारने गोकुळवर 5 शासननियुक्त संचालक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी 4 संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यात येणार असल्याने या निर्णयावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनीही सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून सरकारवर जोरदार टीका केली आहे.
आव्हाड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. गोकुळच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षातील सर्व घटक एकत्र येऊन लढले, तरीही सतेज पाटील यांनी जनतेच्या पाठिंब्यावर विजय मिळवला. मात्र, हा पराभव सत्ताधाऱ्यांना अद्याप स्वीकारता आलेला दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली.
जितेंद्र आव्हाडांची पोस्ट
गोकुळ निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची अक्षरशः अब्रू गेली आहे.अवघा सत्ताधारी वर्ग एकत्रितपणे निवडणूक लढवत असताना देखील बंटी पाटलांनी जनमताच्या पाठिंब्यावर विजयश्री खेचून आणली.
ही बाब सत्ताधारी गटाला अजून पचलेली दिसत नाही.
आज त्यांनी गोकुळ वर 4 शासन नियुक्त सदस्यांची नेमणूक केली आहे.लवकरच या सदस्यांना मताधिकार देखील ते प्रदान करतील.
आता याबाबत समस्त कोल्हापूरकरांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.
ही भूमी समतेची आहे,शाहू महाराजांची आहे हे या मस्तवाल सत्ताधाऱ्यांना दाखवून देणे गरजेचे आहे.
काल परवाच “लोकशाही वाचवा” म्हणून देशभरात भाजपने रॅल्या काढल्या होत्या.आज हीच लोक केवळ एका पराभवाने सैरभर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत.
कोल्हापूर करांनो लक्षात घ्या,
ही वेळ “कंडका पाडायची आहे..!”@satejp
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 4, 2026
‘एका पराभवाने लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत’
गोकुळवर शासननियुक्त संचालकांची नियुक्ती करण्याच्या निर्णयाचा संदर्भ देत आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर लोकशाहीविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप केला. निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही शासननियुक्त सदस्यांच्या माध्यमातून सत्तेचे गणित बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले.
‘काल परवाच लोकशाही वाचवा म्हणून देशभरात भाजपने रॅल्या काढल्या होत्या. आज हीच लोक केवळ एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत,’ अशा शब्दांत आव्हाड यांनी सरकारला लक्ष्य केले.
‘कोल्हापूरकरांनी या निर्णयाकडे लक्ष द्यावे’
गोकुळमधील शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीच्या निर्णयावर कोल्हापूरकरांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे आवाहनही आव्हाड यांनी केले. कोल्हापूरची ओळख ही समतेची आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची भूमी अशी आहे. त्यामुळे सत्तेच्या जोरावर घेतल्या जाणाऱ्या निर्णयांना जनतेने विरोध करायला हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
केंद्र सरकारकडून अग्निवीर योजनेत मोठा बदल; कायमस्वरूपी होण्याचा नवा नियम आला समोर
आपल्या पोस्टच्या शेवटी आव्हाड यांनी कोल्हापूरकरांना एकत्र येण्याचे आवाहन करत ‘ही वेळ कंडका पाडायची आहे’, असे म्हटले आहे.
गोकुळमधील बहुमतानंतरही अध्यक्षपदाचा पेच
गोकुळच्या 25 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने 13 जागा जिंकल्या, तर महायुतीला 12 जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे सतेज पाटील यांच्या गटाकडे एका जागेचे बहुमत आहे. मात्र, सरकारच्या निर्णयानुसार 5 शासननियुक्त संचालकांची नियुक्ती झाल्यास आणि त्यापैकी 4 जणांना मतदानाचा अधिकार मिळाल्यास अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील संख्याबळाचे गणित बदलू शकते.
विराट कोहलीची ऐतिहासिक खेळी! सचिन तेंडुलकरचे दोन विक्रम मोडले, वनडेत केला नवा पराक्रम
या निर्णयाला सतेज पाटील यांनी विरोध दर्शवला असून, न्यायालयीन लढाईचा इशाराही दिला आहे. त्यामुळे गोकुळमधील सत्तासंघर्ष आता केवळ सहकार क्षेत्रापुरता मर्यादित न राहता राज्यातील राजकीय संघर्षाचा मुद्दा बनला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेमुळे या वादाला आणखी धार आली असून, आगामी काळात यावरून महायुती आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.
