बीड : राष्ट्रवादीचे नेते आणि पंकजांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांच्या पाठिंब्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंकजांचा विजयी मार्ग सोपा असेल अशी चर्चा आहे. मात्र, निवडणुकांपूर्वी शरद पवारांनी (Sharad Pawar) स्पेशल डाव टाकत भाकरी फिरवण्याची किमया करण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्या या डावामुळे पंकजांपाठोपाठ बीड लोकसभेचा पेपर सोडवताना महायुतीतील नेत्यांचा चांगलाच कसं लागणार असल्याचे चित्र आता दिसू लागले असून, धनंजय मुंडेंचा (Dhananjay Munde) खास माणूसच पंकजांचा बीडमधील पेपर अवघड करणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
ऐन निवडणुकांच्या तोंडावर पंकजा आणि अजितदादांसमोरील आव्हानं काही केल्या कमी होताना दिसत नसून, बीडचं तख्त काबीज करण्यासाठी शरद पवारांनी त्यांच्याकडील दोन हुकमी एक्के मैदानात उतरवण्याची रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. हे दोन एक्के कोण तर, एक म्हणजे शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे आणि दुसरा एक्का म्हणजे बजरंग सोनावणे. (Sharad Pawar Group Planning Special Candidate Againts Pankaja Munde In Beed)
सुनेत्रा पवार, शरद पवारांनंतर आता शिवतारेंचा डाव; पवारांचे विरोधक कुणाला देणार बारामतीचा ‘ताज’
मेटे सोनावणेंमुळे बदलू शकतं बीडचं चित्र
शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटेंची पत्नी ज्योती मेटे यांना शरद पवार गट बीडमधील लोकसभा निवडणुकीचं तिकीट देणार असल्याची चर्चा सुरु आहे. यासाठी ज्योती मेटे यांनी पुण्यात शरद पवारांची भेटदेखील घेतली आहे. परंतु, मेटे यांचा शासकीय नोकरीतील राजीनामा शिंदे सरकारकडून अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर किंवा त्या निवृत्त झाल्यानंतरच त्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे.
विनायक मेटेंना डावललं गेल्याची भावना शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांमध्ये आजही आहे. मेटेंचं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठं योगदान राहिलं असून, त्यामुळे मराठा समाजाची सहानुभूती त्यांच्या पत्नी ज्योती मेटेंना मिळू शकते. याचाच विचार करून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पवारांकडून ज्योती मेटेंचा उमेदवारीसाठी विचार केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंकजांच्या विजयाचा मार्ग अवघड होण्याची दाट शक्यता आहे.
लेट्सअप विश्लेषण : ‘कमळा’ला का पडली ‘इंजिना’ची गरज; ही आहेत ‘हायलाईटेड’ 5 कारणं
धनुभाऊंचा खास माणूसच पंकजांचा पेपर अवघड करणार
अजित पवार महायुतीत सहभागी झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे राजकीय स्पर्धेक असलेले पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचं मनोमिलन झाले आहे. याचाच फायदा यंदाच्या लोकसभेत पंकजांना होण्याचे अंदाज वर्तवले जात आहे. मात्र, दुसरीकडे अजितदादांच्या गटातील बजरंग सोनावणेंनी पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात सोनावणे हे धनंजय मुंडेंचे खास मानले जातात. एवढेच नव्हे तर, 2019 मध्ये बजरंग सोनावणेंनी खासदार प्रितम मुंडेंविरुद्ध निवडणूक लढवली होती. त्यावेळेस धनंजय मुंडेंचा सोनावणेंना पाठिंबा होता. मात्र, आता हेच सोनावणे पंकजांसाठी अडसर ठरणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सोनावणेंनी प्रीतम मुंडेंना दिलं होतं कडवं आव्हान
एकीकडे ज्योती मेटे किंवा बजरंग सोनावणे या पैकी एकाला शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असून, सोनावणेंचा यासाठी प्रकर्षांने विचार केला जाऊ शकतो. 2019 च्या निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडेंना 6 लाख 78 हजार 175 मतं मिळाली होती. तर, बजरंग सोनावणेंनी या निवडणुकीमध्ये 5 लाख 9 हजार 807 मतं मिळवलेली. प्रीतम मुंडेंनी 1 लाख 68 हजार 368 मतांनी बजरंग सोनावणेंचा पराभव केला होता. त्यामुळे गेल्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने सोनावणे यांनी प्रीतम मुंडे यांना कडवी लढत दिली होती. त्याच पद्धतीने याही वेळेस पंकजांना ते टफ ठरू शकतात असा अंदाज आहे.