Lok Sabha Election Vidarbha 5 Lok Sabha Seat Voting : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) रणधुमाळीतील पहिल्या टप्प्यात मतदान आज पार पडले आहे. देशातील 102 मतदारसंघाचा यात समावेश होता. त्यात विदर्भातील रामटेक, चंद्रपूर, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या पाच मतदारसंघात सायंकाळी पाचपर्यंत सरासरी 54. 85 टक्के मतदान झाले आहे.
नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरीविरुद्ध (Nitin Gadkari) काँग्रेसचे विकास ठाकरे (Vikas Thackeray) अशी लढत होती. हा शहरी मतदारसंघ आहे. तर भाजपचा (BJP) बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात मात्र कमी मतदान झाले आहेत. या मतदारसंघात 48 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघात कमी मतदानाचा फटका नितीन गडकरी यांना बसू शकतो, अशी आता चर्चा सुरू झाली आहे. या पाचही मतदारसंघात किरकोळ वाद गळता शांतेत मतदान झाले. तर काही ठिकाणी उशीरापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती.
रामटेक मतदारसंघात 52 टक्के मतदान
रामटेक मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 52.38 टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघात महायुतीचे राजू पारवे व महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे यांच्यात टफ फाईट झाली आहे. या मतदारसंघात वंचितचे शंकर चहांदे ही निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे येथे तिरंगी लढत झाली आहे.
चंद्रपूरमध्येही 55 टक्के मतदान
चंद्रपूर मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 55. 11 टक्के मतदान झाला. चंद्रपूर मतदारसंघात महायुतीकडून मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) व महाविकास आघाडीच्या प्रतिमा धानोरकर यांच्यात सामना झाला आहे.
भंडारा- गोंदिया मतदारसंघात 56.87 टक्के मतदान
भंडारा- गोंदिया मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 56.87 टक्के मतदान झाले आहे. महायुतीचे या मतदारसंघात सुनील मेंढे हे उमेदवार होते. तर डॉ.प्रशांत पडोळे यांना महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
गडचिरोली- चिमूर मतदारसंघात सर्वाधिक मतदान
गडचिरोली- चिमूर मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 64.95 मतदान झाला आहे. या मतदारसंघात महायुतीचे अशोक नेते आणि महाविकास आघाडीचे नामदेव किरसान यांच्यात लढत झाली आहे.