छगन भुजबळांनी नाशिकचं मैदान सोडलं, लोकसभा निडणुकीतून माघार; वाचा नक्की काय घडलं?

छगन भुजबळांनी नाशिकचं मैदान सोडलं, लोकसभा निडणुकीतून माघार; वाचा नक्की काय घडलं?

Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुका जाहीर होताच अनेक ठिकाणी कोण उमेदवार असेल अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. महाराष्ट्रात सध्या राजकीय परिस्थिती पाहिली तर एका पक्षाचे दोन पक्ष झालेले आहेत अशी आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन भाग झाले तसे राष्ट्रवादीचेही दोन भाग झाले आहेत. त्यामुळे जागा वाटपाचा मोठा पेच सर्वच पक्षातील नेत्यांसमोर असल्याचं दिसलं. त्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यात नाशिक लोकभा आल्याने गेली अनेक दिवसांपासून तेथे कोण उमेदवार असेल अशी चर्चा होती. त्यानंतर तेथे (Chhagan Bhujbal) छगन भुजबळ महायुतीचे उमेदवार असतील अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर ही उमेदवारी निश्चितही मानली जात होती. मात्र, आज पत्रकार परिषद घेत स्वत: छगन भुजबळ यांनी आपण नाशिक लोकसभा (Nashik LokSabha) निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

 

भुजबळ भावूक

यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी मागील काही दिवासांत काय घडलं याचा पूर्ण घटनाक्रम सांगितला. भुजबळ म्हणाले बाकी अनेक ठिकाणचा जागा वाटपाचा तिढा सुटला आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक या जागेची सर्वच स्तरावर उलट-सुलट चर्चा सुरू आहे. यामध्ये मला वाटत एका जागेसाठी महायुतीमध्ये तणाव निर्माण होऊ नये. तसंच, प्रचाराच्या पातळीवर विरोधकांना आघाडी मिळू नये यासाठी मी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला असं स्पष्टीकरण भुजबळ यांनी यावेळी दिलं. हे सगळं सांगत असताना भुजबळ काही प्रमाणात भावूक झाल्याचंही पाहायला मिळाले.

 

होळीच्या काळात काय घडल?

नाशिक या जागेसाठी होळीच्या दिवशी काय घडलं याबाबत बोलले. होळी होती त्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला देवगिरी बंगल्यावर बोलावलं होत. यावेळी तेथे खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे उपस्थित होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक झाली. त्यामध्ये नाशिक मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडला असून, येथे आपण उमेदवार असावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आपण तयारीला लागा असा आदेशच अजित पवार यांनी आपल्याला दिला असंही भुजबळ यावेळी म्हणाले. मात्र, आपण माझ्यापेक्षा समीर भुजबळ योग्य उमेदवार राहील असा प्रस्ताव मांडला. परंतु, समीर भुजबळ यांचा पर्याय अमित शाह यांना नाकारला असून आपणच त्या ठिकाणाहून लढावं असा निरोप अमित शाहांनी दिला असल्याचं अजित पवारांनी आपल्याला सांगितलं. तसंच, स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्याने अमित शाह माझं नावं पुढ करत असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं असा खुलासाही भुजबळांनी यावेळी केला.

 

विश्वास नाही बसला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेत माझा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून याबाबत चर्चा केली. त्यावर फडणवीस म्हणाले अमित शाहांनी आपलंच नाव पुढ केलं आहे. आपणच लढावं असा त्यांचा आदेश आहे असंही फडणवीस सांगितल्याचं भुजबळ यावेळी म्हणाले. त्याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही याबाबद विचारले असता त्यांनीही आपलं नाव स्वत: पंतप्रधानांनी सुचवल्याचं असल्याने अमित शाह यांनी आपल्या नावाचा आग्रह धरला आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिल्याचं भुजबळांनी सांगितल.

 

निर्णय इतका का लांबला

यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, होळी होऊन आता किमान तीन आठवडे झाले आहेत. आपल्याला उमेदवारी देणार हे स्पष्ट झालेलं असताना त्यावर पुन्हा चर्चा का सुरू झाली हे काही लक्षात आलं नाही. दुसरीकडे महाविकास आघाडी आपला उमेदवार घोषीत केला आणि त्यांचा प्रचारही सुरू झाला. ते पाहता महायुतीने नाशिकबाबतचाही निर्णय लवकर घेऊन प्रचाराला सुरूवात करायला हवी होती. परंतु, तसं काही घडलं नाही. त्यावर मला काही भाष्य करायचं नाही. परंतु, मी नाशिकच्या जागेबाबतची गोंधळाची परिस्थिती कायम ठेऊ इच्छित नाही. त्यामुळे मी आज नाशिकच्या उमेदवारीतून माघार घेत आहे अशी घोषणाचं छगन भुजबळ यांनी यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज