Download App

भाजपाचा खास प्रस्ताव! CM शिंदेंना टेन्शन, राष्ट्रवादीसाठी वेगळा प्लॅन; कुणाला किती जागा ?

Amit Shah Meeting on Lok Sabha Election Seat Sharing : राज्यात महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. हा तिढा सोडविण्यासाठीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत. बैठका घेत आहेत. मात्र अजूनही सकारात्मक तोडगा निघालेला नाही. काल अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आज सकाळी पुन्हा बैठक झाली. या बैठकीत 32-10-6 असा फॉर्म्युला दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. हा फॉर्म्युला शिंदे आणि अजित पवारांना (Ajit Pawar) मान्य नाही. शिंदेंनी 22 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागांची मागणी केली आहे. यासाठी भाजप तयार नाही. भाजप अजूनही 32 जागा लढण्यावर ठाम असल्याची माहिती आहे.

मागील निवडणुकीचा विचार केला तर भाजप आणि शिवसेनेची युती होती. या निवडणुकीत भाजपने 25 आणि शिवसेनेने 23 जागा लढवल्या होत्या. यातील 23 जागा भाजप तर 18 जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या. शिवसेनेतील फुटीनंतर 13 खासदार एकनाथ शिंदेंबरोबर आले. त्यामुळे निदान या 13 खासदारांना तरी तिकीट मिळावे अशी मागणी शिंदेंची आहे. परंतु, भाजपने त्यांना 10 जागा देऊ केल्या आहेत. म्हणजेच तीन खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

Lok Sabha : जागावाटपासाठी खलबतं! 13 खासदारांसाठी CM शिंदेंची विनंती, शाह म्हणाले..

परंतु ही रिस्क घेणं शिंदेंना परवडणारे नाही. शिंदेंना बंडात साथ दिली त्यांचाच पत्ता कट होणार असा चुकीचा संदेश जाऊ शकतो. विरोधी पक्षांकडूनही याचं भांडवल केलं जाण्याचीही शक्यता आहे. शिंदेंनी भाजपबरोबर जाऊन काय मिळवलं हाही प्रश्न राहतोच. शिंदेंसोबत गेलेल्या खासदारांना उमेदवारीही मिळवून देता आली नाही, असेही भविष्यात म्हटले जाऊ शकते.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने दहा मतदारसंघांची मागणी केली आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सातारा, रायगड, बारामती आणि शिरुर या चार जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर यातील तीन खासदार शरद पवारांबरोबर राहिले तर एक खासदार अजित पवार गटात आहे. पक्ष फुटीनंतर पक्षाची ताकदही दोन गटांत विभागली आहे. असे असतानाही भाजप अजित पवारांना सहा जागा देण्यास तयार आहे. मात्र अजित पवारांनी दहा जागांची मागणी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांची राजकीय ताकद जास्त आहे. याच गोष्टीचा विचार करून भाजपने त्यांना सहा जागांचा प्रस्ताव दिला आहे.

Maratha Reservation : आरक्षणाच्या मुद्द्यानंतर एकनाथ शिंदे मराठा स्ट्राँगमॅन झालेत का?

राष्ट्रवादीची अन् शिवसेनेची मागणी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने धाराशिव, परभणी, बुलढाणा, गडचिरोली, माढा, हिंगोली, बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या किमान 10 जागांची मागणी केली आहे.

तर शिवसेनेने गतवेळी लढविलेल्या मुंबईतील तीन, ठाणे, कल्याण, पालघर, मावळ, शिरुर, शिर्डी, बुलढाणा, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, रामटेक, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, यवतमाळ-वाशिम आणि अमरावती या जागांची मागणी केली आहे.

follow us