Lok Sabha Elections : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यासाठी राजकीय नेत्यांचे दौरे वाढले आहेत. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शाह (Amit Shah) यांचे एकापाठोपाठ छत्रपती संभाजीनगरचे दौरे आहेत. 12 फेब्रुवारीला ठाकरे तर 15 फेब्रुवारीला शाह हे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्याचा दौऱ्यावर असणार आहेत. विशेष म्हणजे अमित शाह यांची शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभाही होणार आहे.
‘योगींना महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास कमी’; अजित पवार गटाची सडकून टीका
राज्यात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आपणच जिंकणार असे दावे महाविकास आघाडीकडून केले जात आहे, तसेच दावे महायुतीकडून केले जात आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिशन ४५ चे उद्दिष्ट घेऊन भाजप आणि महायुतीतील घटक पक्ष मैदानात उतरणार आहेत. अमित शाह छत्रपती संभाजीनगर येथून या मिशनचा आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.
बाप चोरला म्हणता ‘बाळासाहेब’ वस्तू होते काय? CM शिंदेंनी ठाकरेंना खडसावलंच
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात भाजप संभाजीनगर येथून करणार असल्याने आता या जागेवरून भाजप निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी पुन्हा एकदा जाहीरपणे आपण लोकसभा लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. उमेदवारीबाबत आमची संसदीय समिती निर्णय घेईल, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.
25 वर्षांहून अधिक काळ शिवसेनेशी युती असल्याने भाजपला संभाजीनगरमधून निवडणूक लढवता आली नाही. आता शिवसेनेसोबतची युती तुटल्याने भाजपने संभाजीनगर जागेवर पूर्ण ताकदीने निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार यावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय अपेक्षांचे वारे वाहत आहेत. त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटालाही येथून उमेदवारी मिळण्याची शक्यता बोलली जात आहेत. मात्र, अजित पवार गट अलीकडेच महायुतीचा भाग झाला आहे. त्यामुळे संभाजीनगरची जागा अजितदादा गटाला मिळणार नसल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. तर शिंदे यांच्या शिवसेनेने या जागेवर दावा केला असला तरी भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना कसरत करावी लागणार हे स्पष्ट आहे.