Maharashtra Elections : राज्यात विधानसभेच्या निवडणुका अगदी (Maharashtra Elections) जवळ आल्या आहेत. त्यामुळे जागावाटपाच्या तयारीने वेग घेतला आहे. महायुतीत या मुद्द्यावरून (Mahayuti Seat Sharing) चांगलीच रस्सीखेच झाली आहे. जागावाटप एक प्रकारे मैदानाबाहेरची मोठी लढाई असते. त्यामुळे जास्तीत जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी राजकीय पक्षांत जोरदार सस्सीखेच सुरू आहे. महायुतीतही अशीच परिस्थिती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा (Amit Shah) महाराष्ट्रात आले आहेत. काल त्यांनी नागपुरात आढावा बैठक घेतली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथेही बैठक घेतली. या बैठकांत जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
लहान अन् मोठा भाऊ नाही तर..,; नाना पटोलेंनी मविआच्या जागावाटपाचा फॉर्मुला सांगितला
या बैठकीसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत एका तासाहून जास्त वेळ जागावाटपावर चर्चा सुरू होती अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. भाजपाच्या कोअर कमिटीचीही बैठक पार पडली. यानंतर महायुतीची बैठक झाली. या बैठकीत जागावाटपाच्या मुद्द्यावर प्राथमिक चर्चा झाली. या बैठकीत भाजपला 155 ते 160 जागा, एकनाथ शिंदे गटाला 80 ते 85 तर अजित पवार गटाला 55 ते 60 जागा देण्याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी माहिती मिळाली.
जागावाटपाबाबत आमच्यात कोणताही वाद नाही. समन्वयाने चर्चा होत आहे. अंतिम जागावाटप होईल तेव्हा कोणती जागा कुणाला दिली जाईल याचा निर्णय आम्ही जाहीर करू अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र दौरा केला आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने हा दौरा होत आहे. विदर्भ, मराठवाडा, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या असे दानवे यांनी सांगितले.
अजित पवार गटाने महायुतीतील काही घटकांवर नाराजी व्यक्त केली आहे. खासदार अनिल बोंडे आणि आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अजित पवार गट अस्वस्थ आहे. सुनील तटकरे यांनी या प्रकरणी थेट दिल्ली येथे तक्रार देणार असल्याचं म्हटलं आहे. या सगळ्या घडामोडींमुळे महायुतीतील मतभेद अधिक उघड झाले आहेत.
सध्या अजित पवार यांच्या गटाकडे ४० आमदार आहेत. जर त्यांनी महायुती सोडली तर त्यांना स्वतंत्रपणे ६० जागा लढवता येतील, असं मानले जात आहे. हा निर्णय घेतल्यास ते निवडणुकीत मोठ्या संख्येने जिंकू शकतात. त्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने चक्रव्यूह रचला असल्याचा आरोप होत आहे. याबाबत साम टीव्हीने देखील माहिती दिली आहे.