Maharashtra Exit Poll: महाराष्ट्राच्या सत्तेची वाट विदर्भातून जाते असं म्हणताात. विदर्भातील जनतेच्या कौल ज्याच्या पाठीमागे त्याचा सत्तेचा मार्ग सोपा असंच काहीसं समीकरण तयार झालं. अन् ते खरंही आहे. पण, याच विदर्भात लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगलाच दणका बसला होता. चांगला जनाधार असतानाही फक्त दोन जागा जिंकता आल्या होत्या. आता हीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीत राहिल का असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. या प्रश्नाचं उत्तर काही प्रमाणात देण्याचा प्रयत्न विधानसभा निवडणुकीतील मतदानानंतरच्या एक्झिट पोल्सने केलाय. यंदा विदर्भात महायुतीसाठी पेपर सोपा असल्याचं भाकित बहुतेक एक्झिट पोल्सने वर्तवलं आहे.
गेल्या पाच वर्षांतील नाट्यमय घडामोडींनंतर काल महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) मतदान झालं. राज्यातील दिग्गज नेत्यांचं भवितव्य आता मतपेटीत बंद झालं. येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, आता मतदानानंतरच्या चाचणीचे म्हणजे एक्झिट पोलचे आकडे समोर आलेत. झी 24 तासच्या जेनिया एआयच्या एक्झिट पोलने (Zeenia AI Exit Poll) विदर्भात महायुती (Mahayuti) मुसंडी मारेल, असा अंदाज वर्तवला आहे.
Jharkhand Election Exit Poll Result 2024 : एक्झिट पोलचा काँग्रेसला धक्का, झारखंडमध्ये भाजप सरकार
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात 10 पैकी 2 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने 7 जागा जिंकल्या होत्या. मात्र, Zeenia AI एक्झिट पोलनुसार, लोकसभेतील पिछेहाटीनंतर महायुतीचं विदर्भात जोरदार कमबॅक करणार असल्याचा अंदाज आहे. Zeenia AI एक्झिट पोलनुसार महायुतीला 32 ते 37 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर मविआला 24 ते 29 जागांवर समाधान मानावे लागणार आहे.
विदर्भात एकूण 62 विधानसभा मतदारसंघ येतात. लोकशाही रुद्रच्या एक्झिट पोलनुसार विदर्भात भाजपला 23 जागा मिळण्याचा अंदाज आहे. शिंदे गटाला 4, अजित पवार गटाला चार जागा मिळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाला 21, ठाकरे गटाला 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे चार उमेदवार निवडून येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
एसएएस ग्रुप हैदराबादने दिलेल्या एक्झिट पोलमध्ये मात्र महाविकास आघाडीचा विदर्भात दबदबा राहिल असा कल आहे. विदर्भात महाविकास आघाडीला 33 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर महायुतीला 26 ते 27 जागा मिळतील असा अंदाज आहे.
Zeenia AI Exit Poll चाअंदाज
विदर्भ – 62
महायुती – 32-37
मविआ – 24-29
इतर – 00-02
मॅट्रीझचा पोल काय सांगतोय़
मॅट्रीझच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येऊ शकतं. महायुती जवळपास 150 ते 170 जागा जिंकू शकते. तर महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळण्याची शक्यता आहे. पीपल्स पल्सचा अंदाज सांगतो की महायुतीला 137 ते 157 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर अन्य पक्ष आणि अपक्षांना 2 ते 8 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
चाणक्यचा पोल सांगतोय महायुतीचं सरकार
चाणक्य स्ट्रॅटेजीनेही महाराष्ट्र निवडणुकीचे अंदाज दिले आहेत. यानुसार भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील महायुतीला 152 ते 160 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा मिळतील असा अंदाज चाणक्यने व्यक्त केला आहे. सहा ते आठ जागा अपक्षांना आणि अन्य पक्षांना मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यातील जनतेने कोणाला कौल दिला, हे 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल.