Download App

“संजय राऊत कितना झूठ बोलोगे?” ‘त्या’ बैठकीचा उल्लेख करत आंबेडकरांचा हल्लाबोल

Prakash Ambedkar Criticized Sanjay Raut : राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी राजकीय (Lok Sabha Election) पक्षांकडून केली जात आहे. यातच काल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी (Prakash Ambedkar) आठ उमेदवारांची घोषणा करत महाविकास आघाडीला दणका दिला. यानंतर महाविकास आघाडीचे नेते विशेषतः संजय राऊत यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत राऊत यांच्यावर (Sanjay Raut) निशाणा साधला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

मित्र असून सुद्धा पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं. वंचितच्या प्रतिनिधीला बैठकीसाठी निमंत्रण का दिले नाही. संजय राऊत यांनी अकोल्यात माझ्याविरोधात उमेदवार देण्याची भाषा केली होती. एकीकडे आघाडी करण्याची भाषा करायची, भ्रम निर्माण करायचा आणि दुसरीकडे आम्हालाच निवडणुकीत पाडण्याचं षडयंत्र रचायचं. हेच आपले विचार आहेत का? असा सवाल वंचित आघडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राऊत यांना विचारला आहे.

दरम्यान, काल पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली होती. लोकसभा निवडणुकांसाठी वंचितच्या पहिल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यावेळी आंबेडकरांनी मनोज जरांगेंसोबत युती करणार असल्याचीही घोषणा केली. मात्र, याबाबत जरांगेंनी 30 मार्चपर्यंत थांबण्याची विनंती करण्यात आल्याचे आंबेडकरांनी सांगितले. या नव्या आघाडीमुळे आता प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. आंबेडकर स्वतः अकोल्यातून लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

वंचितच्या पहिल्या यादीत कुणाला मिळाली संधी

प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत स्वतः प्रकाश आंबेडकर अकोल्यातून लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. तर, भंडारा-गोंदिया : संजय केवट, गडचिरोली : हितेश पांडूरंग मडावी, चंद्रपूर : राजेश बेले, बुलडाणा : वसंतराव मगर, अमरावती : प्राजक्ता पिल्लेवान, वर्धा : प्रा. राजेंद्र साळुंके तर, यवतमाळ-वाशिममधून खेमसिंग पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

follow us