Uddhav Thackeray warns Election Commission : ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अन् जोरदार प्रचार सुरू झालेला असतानाच निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. ठाकरेंनी मशाल चिन्हासाठी तयार केलेल्या गाण्यातून ‘हिंदू’ आणि ‘जय भवानी’ शब्दांवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. हे दोन्ही शब्द वगळावेत यासाठी निवडणूक आयोगाने नोटीसही बजावली आहे. परंतु, उद्धव ठाकरे यांनी मात्र आयोगाच्या या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. तुळजाभवानी माता महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत ‘जय भवानी’ शब्द काढणार नाही. भवानी मातेचा अपमान सहन करणार नाही, अशा शब्दांत निवडणूक आयोगालाच आव्हान दिले. उद्धव ठाकरेंच्या या पवित्र्यानंतर निवडणूक आयोग आणि ठाकरे गटात संघर्ष उडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Uddhav Thackeray : सांगलीसह सगळीकडे शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करा; ठाकरेंनी कॉंग्रेसला ठणकावलं
निवडणूक आयोगाचे पत्र मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी आयोगाच्या कारभारावत संताप व्यक्त केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह धर्म आणि देवाच्या नावावर मते मागतात. मध्य प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटकात निवडणूक झाली त्यावेळी आम्ही निवडणूक आयोगाकडे विचारणा केली होती.
‘जेव्हा मतदानासाठी बटण दाबाल, तेव्हा जय बजरंग बली म्हणून बटण दाबा’ असे पंतप्रधान मोदी म्हणताना एका व्हिडिओत दिसत आहेत. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये ‘अयोध्येत दर्शन करायचं आहे, खर्चही होईल. पण मी सांगतो नाही होणार. 3 तारखेला मध्यप्रदेशात भाजपाचं सरकार बनवा, सरकार सगळ्यांना मोफत रामललाचं दर्शन घडविल’, असे अमि शाह म्हणताना दिसत आहेत.
याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. पण निवडणूक आयोगाने मोदी आणि शहांना काही सूट दिली आहे का? त्यांच्यासाठी नियमांत काही बदल केला आहे का? बजरंग बलीचं नाव घेऊन मोदी बटण दाबायला सांगत असतील अगदी कचाकचा म्हणत नसतील तरी बटण दाबायला सांगत आहेत. हे निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेत बसते का, असा सवाल उपस्थित करत अनेकदा स्मरणपत्र देऊनही काहीच कार्यवाही झाली नाही, असे ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राचा महानालायक कोण? स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे.. बावनकुळे इतकं का चिडले?
निवडणूक आयोगाकडून आम्हाला एक पत्र मिळालं. काही दिवसांपूर्वी आम्ही पक्षाच्या मशाल चिन्हावर एक गीत लाँच केलं होतं. या गाण्यातील दोन शब्द काढा असं आयोगाने पत्रात म्हटलं आहे. हिंदू हा तुझा धर्म. आता हिंदू हा तुझा धर्म म्हणण्यात चुकीचं काय? हिंदू धर्माच्या आधारावर आम्ही मतं तर मागितली नाहीत. आजपर्यंत आम्ही कधीही देवाच्या नावावर मतं मागितली नाहीत. भाजप हे काम करतं. तसेच आमच्या घोषणेतील ‘जय भवानी’ हा शब्द काढून टाका असं आयोगाने म्हटलं आहे.
भवानी माता तर आमचं कुलदैवत आहे. मग भवानी मातेचं स्मरण करणं हा काय गुन्हा आहे का? जय भवानी म्हणत मतं द्या असं आम्ही कुठेच म्हटलेलं नाही. हे आम्ही कधीच सहन करणार नाही. तरीही जर आयोगाला आमच्यावर कारवाईच करायची असेल तर आधी या दोघांवर कारवाई करा. महाराष्ट्राचं कुलदैवत भवानी मातेचा उल्लेख तर आम्ही जरूर करणार. भवानी मातेचा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही. हा अन्याय आहे. हा अन्याय आम्ही कधीच सहन करणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला.