Mahadev Jankar demand Madha Lok Sabha Constituency : महाविकास आघाडी आणि महायुतीचं जागावाट अजून ठरलेलं नाही. परंतु, महायुतीने माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नक्की केला आहे. भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत रणजित नाईक निंबाळकर यांचं नाव होतं. त्यामुळे अकलूजमधील मोहिते गट कमालीचा नाराज झाला आहे. सध्या त्यांनी वेट अँड वॉचचं धोरण घेतलं आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण हे कोडं कायम आहे. त्यातच आता या माढ्याच्या तिढ्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांची एन्ट्री झाली आहे.
माढा आणि परभणी या दोन्ही मतदारसंघात उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते. त्यानंतर आज जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांत जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती समोर आली नसली तर जानकर यांनी सूचक शब्दांत बरेच काही सांगून टाकले.
Loksabha Election 2024: माढ्याची जागा महादेव जानकरांना सोडणार ? पवार लेकीची जागा सेफ करणार
जानकर म्हणाले, शरद पवार यांच्याबरोबर आमची सकारात्मक चर्चा झाली. माढा मतदारसंघातील मतदान अजून वेळ आहे त्यामुळे दरम्यानच्या काळात काय घडामोडी घडतात त्यानुसार आमचं नियोजन सुरू आहे. त्यामुळे यावर आताच काही बोलणे योग्य ठरणार नाही. माढा आणि परभणी या दोन्ही मतदारसंघांतून फोन येत असतात. आम्ही मविआकडे तीन जागांची मागणी केली होती. या तीनपैकी किमान दोन तरी जागा आम्हाला मिळाव्यात अशी आमची मागणी असल्याचे जानकर म्हणाले. जानकरांनी मागणी केलेल्या जागांमध्ये माढा मतदारसंघाचाही समावेश आहे.
महादेव जानकर हे परभणी आणि माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरण्याची चाचपणी करत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे काही नेतेही जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून लढावे, यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून रासपची माढा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात तयारी सुरू आहे. महादेव जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत. या मतदारसंघात धनगर समाज बहुसंख्येने मतदार आहेत. ही जमेची बाजू आहे.
या मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकर हे भाजपचे खासदार आहेत. जानकर हे सध्या तरी महायुतीमध्ये आहेत. परंतु ही जागा त्यांना मिळण्याची परिस्थिती नाही. तर जानकर हे सत्ताधाऱ्यांविरोधात अनेकदा बोलताना दिसत आहेत. त्यामुळे ते ऐनवेळी महाविकास आघाडीत जातील, अशी चर्चा सुरू झाली आहे.
शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट होतं, सुधीर मुनगंटीवार यांनी खोचक शब्दात सुनावलं