Sanjay Gaikwad : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी विधानसभा निवडणुकीत जागावाटपाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सुरू झालेला वाद अजूनही थांबलेला नाही. या वादात आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी उडी घेतली आहे. शिवसेना (Shiv Sena) म्हणून आम्ही कमीत कमी 130 ते 140 जागा लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : Maharashtra Politics : ‘३२ वर्षे हे लग्नासाठीचं’, संजय गायकवाड यांनी दिला आदित्य ठाकरे ‘हा’ सल्ला
माध्यमांच्या प्रतिनिधींना गायकवाड यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, की सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा शिंदे गट नाही तर शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना. भाजप शिवसेनेची युती बाळासाहेबांनी केलेली आहे. त्यामुळे अन्य कोणताही नेता काही घोषणा करत असेल तर त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ राहत नाही. आमची युती पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे.
ते पुढे म्हणाले, की आम्ही शिवसेना म्हणून कमीत कमी 130 ते 140 जागा लढविणार आहोत. भाजप हा आमच्यापेक्षा मोठा पक्ष आहे त्यामुळे तो जास्त जागा लढवेल हे जरी दिसत असले तरी आम्ही 125 पेक्षा कमी जागा लढणार नाही. अशा प्रकारचे वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांना त्यांच्या पक्ष श्रेष्ठींनी समजावून सांगावे, असेही गायकवाड यांनी सांगितले.
Sanjay Gaikwad : मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारा जन्माला यायचाय.. आमदार गायकवाडांचा ठाकरेंवर निशाणा
याआधी आमदार संजय शिरसाट यांनीही बावनकुळे यांना सुनावले होते. ते म्हणाले, की बावनकुळेंच्या स्टेटमेंटमध्ये काही दम नाही. बावनकुळेंना एवढे कोणी अधिकार दिलेले नाहीत, असे म्हणत त्यांनी बावनकुळेंना सुनावले. असे वक्तव्य केल्याने युतीमध्ये बेबनाव येतो याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे. 48 जागा लढवणारे आम्ही मुर्ख आहोत का, असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला.