Sanjay Gaikwad : मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारा जन्माला यायचाय … आमदार गायकवाडांचा ठाकरेंवर निशाणा
बुलढाणा : शिवसेनेतील बंडानंतर राज्यात शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. यातच दोन्ही गटातील नेतेमंडळी एकमेकांवर टीका करत असतात. यातच माजीमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याना आव्हान दिले होते. त्यांच्या या आव्हानाला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमत्र्यांचा पराभव करणारा अजून जन्माला यायचा आहे, अशा शब्दात आमदार गायकवाड यांनी ठाकरेंना शाब्दिक टोला लगावला आहे.
राज्यात आगामी निवडणुका पाहता राजकीय पक्षांकडून हालचाली देखील सुरु झाल्या आहेत. यातच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या बंडखोरीनंतर शिंदे गट व ठाकरे गट यांच्यातील वाद समोर आला आहे. नुकतंच माजीमंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणुकीतून आव्हान दिले आहे.
नेमकं काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा आणि वरळी मध्ये माझ्या विरोधात निवडून येऊन दाखवावं अस आवाहन आदित्य ठाकरे यांनी दिल होते.
यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा त्यांच्याच मतदारसंघात पराभव करणारा अजून जन्माला यायचा आहे. जे कोणी असे आव्हान करत आहे त्यांनी चार चार लोकांशी तडजोड करून निवडणुका जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीला जवळ केले आणि तडजोडी केल्या अशा शब्दात आमदार गायकवाड यांनी आदित्य ठाकरेंना सुनावले आहे.