Download App

सामान्य कार्यकर्ता ते आदित्य ठाकरेंचे राईट हँड; ‘ईडी’ने अटक केलेले सूरज चव्हाण नेमके कोण?

Suraj Chavan Arrested ED : कोरोना काळातील काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना अटक केली. अनेक दिवस चौकशी केल्यानंतर ईडीने काल चव्हाण यांना अटक केली. या कारवाईमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कोरोना काळात गरिब स्थलांतरीत कामगारांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी महापालिकेकडून 52 कंपन्यांना कंत्राट देण्यात आलं होतं. सुरुवातीच्या 4 महिन्यांत 4 कोटी खिचडीचे पॅकेट वाटप करण्यात आले पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती. ईडीने कारवाई करत सूरज चव्हाण यांना अटक केली. या कारवाईनंतर सूरज चव्हाण यांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

सामान्य कार्यकर्ता ते आदित्य ठाकरेंचा राईट हँड 

ठाकरे गटाचे सचिव आणि आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे सूरज चव्हाण यांना अटक झाली. सूरज चव्हाण आदित्य ठाकरेंचे राईट हँड समजले जातात. त्यांची सूचना म्हणजे आदित्य ठाकरेंचा आदेश असे युवासेनेत समजले जाते. युवासेनेचा साधारण कार्यकर्ता नंतर आदित्य ठाकरेंचा विश्वासू तेथून पुढे ठाकरे गटाचे सचिव असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.

सूरज चव्हाण हे मूळचे शिवसैनिक आहेत. भायखळा शाखेत असल्यापासून ते शिवसेनेचे काम करतात. भायखळा शाखेत असताना त्यांची शिवसेना भवन येथे अनेकांशी संबंध आला. त्यातून अनेकांशी त्यांची मैत्री झाली. ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांचे देखील ते खास समजले जातात. त्यामुळेच शिवसेना भवनमध्ये सूरज चव्हाण यांचा दबदबा निर्माण झाला. गेले अनेक दिवस अनिल देसाई यांच्यासोबत काम केल्यानंतर चव्हाण यांनी युवासेनेत काम सुरू केले. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या जवळ गेले. आदित्य ठाकरे यांच्या बैठकांचे नियोजन करणे, दौऱ्याची व्यवस्था करण्याचे काम सूरज चव्हाण पाहत होते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही महाविकास आघाडीत सत्तेत आली. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर सूरज चव्हाण यांचा रुबाब त्यावेळी मंत्रालयात प्रत्येकाने पाहिला आहे.

ईडीचा दणका : आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना अटक

सहाव्या मजल्यावर सूरज चव्हाण यांची वर्दळ ही त्याकाळी चर्चेचा विषय होता. विशेषतः अनेक मंत्री आमदार यांच्यापेक्षा सूरज चव्हाण यांना सर्व सचिवांकडे सहज वावर होता. हे सर्वांनी अनुभवले आहे. काही अधिकारी व सूरज चव्हाण यांची असलेली मैत्री कुतुहलाचा विषय होती. पण सूरज चव्हाण यांची इमेज मीडियाच्या चर्चेत कधीच राहिली नाही. सरकार येण्यापूर्वी आणि सरकार असताना सूरज चव्हाण यांच्यात झालेला आमूलाग्र बदल नक्कीच नजरेत भरणारा होता. सूरज चव्हाण सत्तेत असताना नव्हे तर आता चर्चेच्या केंद्रबिंदू ठरले आहेत. कोविड काळात मुंबई महापालिकेत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी त्यांची चौकशी झाली नंतर त्यांना अटकही झाली.

आदित्य ठाकरेंचा आग्रह अन् सूरज चव्हाण थेट सचिव 

कोरोना काळात वरळीत आदित्य ठाकरे यांच्याबरोबर सूरज चव्हाण यांनीही मोठे काम केले. या संकटाच्या काळात आदित्य ठाकरेंनी काही ट्विट केलं तर त्या संबंधितांना मदत करण्याची जबाबदारी सूरज चव्हाण यांच्याकडेच असायची. मुंबईतील सर्व लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघांची त्यांना चांगली जाण होती. मतदारसंघांची खडा न् खडा माहिती त्यांच्याकडे असायची. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेने सर्व दहा जागा जिंकल्या होत्या. यामागेही सूरज चव्हाण यांचीच रणनिती असल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. राजकीय बाजूही पक्की असल्याने आदित्य ठाकरेंच्या आणखी जवळ गेले. इतकेच काय तर मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई असे दिग्गज असतानाही केवळ आदित्य ठाकरे यांच्या आग्रहामुळे उद्धव ठाकरेंनी सूरज चव्हाण यांची ठाकरे गटाच्या सचिवपदी नियु्क्ती केली होती.

ठाकरेंसोबत सावलीसारखे असणारे सूरज चव्हाण कोण?

सूरज चव्हाण यांच्यावर आरोप काय ?

कोरोना काळात सूरज चव्हाण यांच्या मध्यस्थीने अनेक कंपन्यांना कामे मिळाली असा आरोप त्यांच्यावर केला जात होता. ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी कामे मिळवून दिली होती. त्यांच्यावरील या आरोपांची नंतर चौकशी करण्यात आली.

follow us