Download App

राष्ट्रवादीत भाकरी फिरली ! रोहित पवारांची महत्वाच्या पदावर शिफारस

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल मुंबईतील पक्षाच्या युवा संवाद कार्यक्रमात भाकरी फिरवण्याचे नव्या चेहऱ्यांना पक्ष संघटनेत सामावून घेण्याचे संकेत दिले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू असतानाच त्यांच्या या वक्तव्याची प्रचितीही आली आहे. राज्य विधिमंडळाच्या अत्यंत महत्वाच्या अशा लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे तरुण आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचे नाव सुचवले आहे. पक्षातील अन्य ज्येष्ठ नेते मंडळींना बाजूला करून थेट रोहित यांचे नाव सुचविण्यात आल्याने राष्ट्रवादीत खरेच भाकरी फिरली, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

राज्य विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या (PAC) अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रथमच आमदार रोहित पवार यांच्या नावाची शिफारस केली आहे. या समितीचे प्रमुख सहसा विरोधी पक्षाचे आमदारच असतात. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार येऊन नऊ महिने उलटून गेले तरीही लोकलेखा समिती अस्तित्वात आलेली नव्हती. त्यानंतर आता सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. तर या समितीच्या अध्यक्षपदासाठी आमदार रोहित पवार यांचे नाव राष्ट्रवादीने सुचवले आहे.

मला पिढीचंच आश्चर्य वाटतं… राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण

या संदर्भात आमदार पवार यांच्याशी संपर्क साधला असता या घडामोडींबाबत काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. पण जर पक्षाने मला जबाबदारी देण्याचे ठरवलेच असेल तर मी राज्याच्या भल्यासाठी माझे कर्तव्य पार पाडील, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने पीएसीच्या अध्यक्षपदासाठी रोहित पवार यांचे नाव सुचवले असले तरी या संदर्भात मित्र पक्षांबरोबर चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

विशेष म्हणजे, नुकतेच निवडून आलेले अपक्ष आमदार सत्यजित तांबे हे राज्य विधानपरिषदेतून नामनिर्देशित केलेल्या पाच नेत्यांमध्ये आहेत. तांबे हे प्रथमच आमदार झाले आहेत.आधी ते काँग्रेसमध्येच होते. मात्र, नाशिक पदवीधर निवडणुकीत अनपेक्षित घडामोडी घडल्या आणि त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली.तांबे यांच्या व्यतिरिक्त एकनाथ खडसे, काँग्रेसचे अभिजीत वंजारी, ठाकरे गटाचे अनिल परब, भाजपचे प्रविण दरेकर हे विधान परिषदेतून पाच नामनिर्देशित सदस्य आहेत.

पीएसी काय आहे ?

पीएसी म्हणजेच लोकलेखा समिती. ही राज्य विधिमंडळातील सर्वात महत्वाची समित्यांपैकी एक समिती आहे. या समितीत विधानसभेचे वीस आणि विधान परिषदेचे पाच सदस्य आहेत. पीएसी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) च्या अहवालांची छानणी करते. या समितीचे प्रमुख सहसा विरोधी पक्षातील आमदारच असतात.

काय म्हणाले शरद पवार ?

पक्षात तरुणांना सक्रिय करायचे असेल तर त्याना पक्षात विविध पद दिली गेली पाहिजे. आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. अशा शब्दात शरद पवार यांनी पक्षात होऊ घातलेले बदल याचे संकेत दिले आहेत. तरुणांना संधी दिली गेली पाहिजे. तरुणांना पक्षात घ्यावे असे मी नेत्यांना सांगेल. जे लोक संघटनेत काम करतात त्यांना सांगण आहे की पाच ते सहा वर्ष युवक चळवळीत काम करणाऱ्यांना संघटनेत घ्या. याठिकाणी त्यांनी काम प्रस्तावित केलं तर त्यांना महापालिकेसाठी संधी द्या, असे शरद पवार चेंबूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या युव संवाद कार्यक्रमात म्हणाले होते.

2024 मध्ये रोहित पवार ? 

दरम्यान, समित ठक्कर यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. त्यांनी त्यांनी म्हटले आहे की अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील नाही तर 2024 मधील निवडणुकीत आमदार रोहित पवार राष्ट्रवादीचे नेतृत्व करतील. 12 डिसेंबर या दिवशी रोहित पवार अधिकृतपणे पक्षाची सूत्रे हाती घेतील असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Tags

follow us