BJP : राज्य सरकारच्या कंत्राटी भरतीच्या निर्णयावर विरोधकांनी मोठा गदारोळ केल्यानंतर काल अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. या निर्णयाची माहिती देताना त्यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर याचे खापर फोडले. त्यांच्याच काळात कंत्राटी भरतीचे निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे पाप आमच्या माथी नको, असे म्हणत त्यांनी हे निर्णय रद्द केल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही आक्रमक भुमिका घेत शरद पवार (Sharad Pawar) आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाक घासून माफी मागावी अशी मागणी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी बावनकुळेंची लायकीच काढली होती. यानंतर हा वाद आणखी वाढला आहे. भाजपने ट्विट करत शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवार साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी राजकारणात आले तेव्हापासून एकाच पक्षात आहेत. त्यांची नाळ भाजपाशी जोडलेली आहे. त्यांनी कधीही पक्ष बदलला नाही, विचार बदलला नाही.
काही लोकांनी राजकारणात आल्यापासून पक्ष किती बदलले आणि किती वेळा विचार बदलले हे मोजताही येणार…
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 22, 2023
भाजपने काय उत्तर दिले ?
शरद पवार साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी राजकारणात आले तेव्हापासून एकाच पक्षात आहेत. त्यांची नाळ भाजपाशी जोडलेली आहे. त्यांनी कधीही पक्ष बदलला नाही. विचार बदलला नाही. काही लोकांनी राजकारणात आल्यापासून पक्ष किती बदलले आणि किती वेळा विचार बदलले हे मोजताही येणार नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी गुरुच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या व्यक्तीनं पक्षनिष्ठ आणि प्रामाणिक माणसाबद्दल फार बोलू नये.
ज्या काँग्रेसने तुम्हाला पक्ष विरोधी कारवायांसाठी पक्षातून काढले त्याच काँग्रेससोबत तुम्ही पुन्हा युती केली. ही कृती तुमच्या कोणत्या स्वाभिमानात बसते. पवार साहेब तुमच्या याच खोट्या आणि दलबदलू प्रवृत्तीमुळे तुमचा संपूर्ण पक्ष फुटला. जीवाभावाची माणसं सोडून गेली. ती का गेलीत. तुम्ही कधी आत्मपरिक्षण करणार आहात की नाही असा सवाल भाजपने या ट्विटमधून विचारला आहे.
काय म्हणाले होते शरद पवार ?
या गृहस्थांचं समाजात, जनमानसात नक्की काय स्थान आहे हे मला माहिती नाही. एकच उदाहरण सांगतो. ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने त्यांना तिकीटही दिलं नव्हतं. ज्या व्यक्तीबद्दल स्वतःचा पक्ष तिकीट द्यायलाही लायक नाही असं म्हणतो त्याच्यावर आपण काय भाष्य करायचं.
बावनकुळे बारामतीवर बोलतात कारण लोकांनी बातमी वाचावी आणि बातमी छापावी असं वाटत असेल तर बारामतीचं नाव घ्यावं लागतं. त्यामुळेच त्यांच्याकडून बारामतीचा उल्लेख सारखा केला जातो. जे पक्षाला तिकीट देण्यासाठीही योग्य वाटत नाहीत त्यांनी बारामतीवर चर्चा करण्याचं काहीच कारण नाही, अशा तिखट शब्दांत पवार यांनी बावनकुळेंना प्रत्युत्तर दिले होते.
“बडी सोच करो, बडा दिलं रखो” : अजितदादांसोबत एकाच मंचावर; सुप्रिया सुळेंचा कार्यकर्त्यांना सल्ला