Laxman Hake Criticized Sharad Pawar : गेली आठ नऊ महिने बीड जिल्ह्यासह अनेक ठिकाणी अशांतता निर्माण झालेली असताना शरद पवार एक (Sharad Pawar) शब्द बोलले नाहीत. सर्वपक्षीयांची बैठक बोलावली असताना देखील ते गैरहजर राहिले. शरद पवार यांनीच मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) आंदोलनाला शांतपणे पाठिंबा दिला असा गंभीर आरोप लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केला. लक्ष्मण हाके यांनी आज माध्यमांशी संवाद साधत मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली.
लक्ष्मण हाके उपोषण सोडणार? छगन भुजबळांसह सहा मंत्री उपोषणास्थळी हाकेंची आज भेट घेणार
लक्ष्मण हाके पुढे म्हणाले, मनोज जरांगे यांच्या राज्यात ठिकठिकाणी शांतता रॅली निघाल्या. या रॅलींसाठी शाळा कोणत्या अधिकारात बंद ठेवल्या, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कायदा सुव्यवस्था ठेऊ शकत नाही का? आरक्षणाला डोळ्यांसमोर ठेऊन राज्यातील ओबीसी समाजामध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. मनोज जरांगे आपल्या भाषणात आम्ही क्षत्रिय मराठे आहोत हे सांगत वर्णवर्चस्वाची भाषा करतात आणि राज्याचे मुख्यमंत्री त्यांना रेड कार्पेट घालत आहेत.
ओबीसी आणि मराठा बांधवांचा संघर्ष ठेऊन यांना विधानसभा निवडणूक काढायची आहे. विधानसभा निवडणुका संपल्यानंतर ओबीसींचे महाराष्ट्रातील आरक्षण संपलेलं असेल. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण आधीच संपल्याचा उल्लेख हाके यांनी यावेळी केला. सांगलीमध्ये सर्वपक्षीय ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता. ओबीसी मेळाव्यासाठी काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांना आमंत्रित करण्यासाठी गेले असता ‘तुम्हाला आता राष्ट्रपती व्हायचं का?’ म्हणून हेटाळणी केली गेली अशी खंत लक्ष्मण हाके यांनी बोलून दाखवली.
शरद पवारांचं आवाहन म्हणजे लबाडाघरचं आमंत्रण; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. मनोज जरांगे यांनीही जर आम्हाला आरक्षण देणार नसाल तर राजकारणची भाषा करावीच लागेल असा इशारा सरकारला दिला होता. त्यांच्याकडूनही राज्यातील सर्व मतदारसंघांत चाचपणी केली जात आहे. अशा परिस्थितीत मनोज जरांगे पाटील आगामी निवडणुकीत कुणाला उमेदवारी देणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. या घडामोडींवर हाके यांनी भाष्य केले. मनोज जरांगे म्हणजे बिनबुडाचा लोटा असून ते विधानसभेला २८८ सोडा एकही जागा लढवणार नाही, लोकसभेप्रमाणे काही पक्षांना पाठिंबा देतील असं भाकित लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्याबद्दल केलं.