Download App

Maratha Reservation : संभाजी भिडे मनोज जरांगेंना भेटताच मुख्यमंत्र्यांची कोंडी !

Maratha Resrvation : मराठा समाजाला आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) मागील 15 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. या काळात त्यांच्या पोटात अन्नाचा कणही गेलेला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, समाधानकारक तोडगा अजूनही निघालेला नाही त्यामुळे जरांगे यांनी उपोषण सुरुच ठेवले आहे. आज उपोषणाच्या पंधराव्या दिवशी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. उपोषणात काहीतरी सकारात्मक घडेल अशी चिन्हे दिसत असताना आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी प्रयत्न करत असतानाच संभाजी भिडे यांची एन्ट्री झाल्याने आता मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांचीच कोंडी झाल्याचे दिसत आहे.

Jalna Maratha Protest : मराठा आंदोलनात झालेली दगडफेक भिडेंच्या सांगण्यावरून? समन्वयकांचा आरोप

जालन्यात मराठा आंदोलकांवर ज्यावेळी लाठीचार्ज झाला त्यावेळी हा आदेश कुणी दिला हा प्रश्न निर्माण झाला होता. गृहखाते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे असल्याने सगळा रोष त्यांच्यावरच होता. तसेच मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात घुसून उद्रेक केला, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे निमंत्रक संभाजी लाखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता. मध्यंतरी संभाजी भिडे यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे त्यांच्या विरोधात रोष वाढला होता. राज्यात ठिकठिकाणी आंदोलनेही झाली होती. त्यांच्या वक्तव्यांमुळे सरकारचीही चांगलीच पंचाईत झाली होती.

अशा परिस्थितीत आज संभाजी भिडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj  Jarange) यांची भेट घेत त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी रोहयो मंत्री संदीपान भुमरे आणि अर्जुन खोतकरही उपस्थित होते. संभाजी भिडे यांनी जी विनंती केली. त्यावरून येथे त्यांनी सरकारची बाजू मांडल्याचेच ध्वनित होत आहे. तर दुसरीकडे या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे यांची कोंडी झाल्याचेही दिसत आहे.

फडणवीस बेईमानी करणार नाही; जरांगेंना भिडेंचे बळ; आंदोलन यशस्वी करण्यासाठी दिला कानमंत्र

मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी सात वेळेस मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. काल सर्वपक्षीय बैठकीत काय निर्णय झाले याची माहिती देण्यासाठी आजही ते उपोषणस्थळी आले होते. त्यांच्यासोबत रोहयो मंत्री सांदिपान भुमरे देखील होते. त्यांची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा सुरू असतानाच संभाजी भिडे देखील येथे पोहोचले. भिडे येथे आल्यावर खोतकर आणि भुमरे या दोघांनीही येथून निघून जाणे पसंत केले. या प्रकाराचीही चर्चा उपोषणस्थळी होती.

काय म्हणाले संभाजी भिडे ?

मराठा आरक्षणासाठी तुमचा लढा योग्यच आहे. सध्याचे सरकार खोटारडे नाही. एकनाथ शिंदे खोटे बोलणारे नाहीत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच आमची भूमिका आहे. पण, एक घाव दोन तुकडे करण्यासारखा हा विषय नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे धुरंधर आहेत. ते धोका देणार नाहीत. आपला शब्द पाळतील, असे म्हणत भिडे यांनी सरकारची बाजू मांडल्याचे दिसले. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जिवाचा आकांत करू नये. मनोज जरांगे यांनी मोठा लढा उभारला आहे. हवं ते मिळवून देण्याची जबाबदारी मलाा द्यावी. सरकारमधील तिन्ही नेते आपल्या शब्दाशी प्रामाणिक राहतील तेव्हा आता जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती भिडे यांनी येथे केली.

follow us