Download App

घड्याळाचं निवेदन पाहिलं अन् रोहित पवार भडकले; म्हणाले, “घड्याळ तर जाईलच पण वेळ”…

Rohit Pawar Criticized Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेलं होतं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. घड्याळ चिन्ह गोठवण्याची मागणी शरद पवार गटाने केली. मात्र न्यायालयाने त्यांची मागणी नाकारत अंतिम निर्णयाच्या अधीन राहून चिन्ह वापरण्याची परवानगी अजित पवार (Ajit Pawar) गटाला दिली. त्यानंतर अजित पवार गटाने निवडणूक प्रचारादरम्यान घड्याळ चिन्हाखाली सूचना लिहिली आहे. यावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यन न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून घड्याळ चिन्ह वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठी एक निवेदन प्रसिद्ध केले. या निवेदनात घड्याळ चिन्हाखाली काही ओळी लिहिल्या आहेत. “भारत निवडणूक आयोगाने अजित अनंतराव पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला ‘घड्याळ’ चिन्ह दिले आहे. हे प्रकरण सध्या माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर आहे आणि अंतिम निकालाच्या अधीन राहून, माननीय सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी सर्व निवडणुकांसाठी ‘घड्याळ’ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे.”

घड्याळ तर जाईलच पण वेळही : रोहित पवार 

या निवेदनावर शरद पवार गटाचे आमदार यांनी प्रतिक्रिया देत अजित पवार गटावर टीका केली. याबाबत त्यांनी एक ट्विट केले. त्यात ते म्हणतात, या निवेदनातील पहिलं वाक्य खरं असलं तरी लाल चौकटीतील अर्ध वाक्य अधिक सत्य आहे. कारण, अंतिम निकालात न्यायालयाने परवानगी दिली तरच घड्याळ चिन्ह पुढे वापरता येईल, अन्यथा घड्याळ तर जाईलच पण वेळ कशी येईल याचा अंदाज लोकांचा विरोध बघता आजच येतोय. राजकारणाला अशा अटी लागू होत असतील तर याचं दुःख वाटतं. पण, विचार बदलल्यामुळे आणि ज्यांचं राजकारच विरोधी पक्षाला संपवण्याच्या अटीवर चालतं त्यांच्यासोबत गेल्याने ही वेळ आली, हे नाकारता येणार नाही!

मोठी बातमी : ऐन निवडणुकांच्या तोंडावर अजितदादांना झटका; अटीशर्तींसह वापरता येणार ‘घड्याळ’

न्यायालयाचा निकाल काय ?

शरद पवार गटाची (Sharad Pawar) घड्याळ चिन्ह गोठवण्याची मागणी अमान्य करत निवडणुकांमध्ये घड्याळ चिन्हाचा वापर न्यायालयाने ठरवून दिलेल्या अटीशर्तींनुसार करण्याचे निर्देश अजित पवारांच्या (Ajit Pawar) गटाला दिले होते. याशिवाय शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे दिलेले चिन्ह अंतिम निकाल येईपर्यंत अधिकृत चिन्ह म्हणून मान्य करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते. सोबत अजित पवार गटाने प्रचारात सर्व ठिकाणी घड्याळ हे चिन्ह आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या केसवर अटीशर्तींसह मिळालं आहे. खरी राष्ट्रवादी कुणाची याचा अंतिम फैसला झाल्यावर ते कायम होईल, असे डिक्लेरेशन नमूद करण्याचे निर्देशही न्यायालयाने अजित पवार गटाला दिले होते.

follow us